पब्जी खेळत 'त्याने' सोडला प्राण!

    दिनांक :31-May-2019
गेल्या काही महिन्यांपासून पब्जीमुळे अनेक घटना घडल्या आहेत.  पण हा गेम खेळणाऱ्यांची संख्या काही कमी होत नाहीये. तरूणांमध्ये या गेमची मोठी क्रेझ बघायला मिळत आहे. या गेममुळे अनेकांना काय काय नुकसान झाले हेही वेळोवेळी समोर आले आहे. आता पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
 
 
 

 
 
मध्यप्रदेशच्या नीमच जिल्ह्यातील ही घटना असून इथे एक मुलगा पब्जी गेम खेळत होता. गेम खेळता खेळता त्याला हार्ट अटॅक आला आणि त्याचा मृत्यू झाला. या मुलाचे नाव फुरकान कुरेशी होते. नीमच जिल्ह्यातील पटेल प्लाझामध्ये तो राहत होता. त्याच्या घरच्यांनी सांगितले की, मुलाला हा गेम खेळण्याची सवय लागली होती. मृत्यूआधीही तो तब्बल ६ तास पब्जी गेम खेळत होता.
ज्यावेळी फुरकानचा मृत्यू झाला त्यावेळी त्याची लहान बहीण फिजा त्याच्याजवळ होती. तिने सांगितले की, गेममध्ये त्याचा एक साथीदार खेळाडू ब्लास्टमध्ये मारला गेला. फुरकान यामुळे काही मिनिटे जोरात ओरडू लागला होता. त्यानंतर त्याने कानातून हेडफोन काढले आणि एकाएकी त्याचा मृत्यू झाला. त्याचं संपूर्ण शरीर लाल झालं होतं. त्याला लगेच डॉक्टरांकडे नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
फुरकानच्या वडिलांनी सांगितले की, 'मी कामासाठी बाहेरगावी राहतो. फुरकान केंद्रीय विद्यालयात १२वी चा विद्यार्थी होता. माझ्या भावाच्या मुलीच्या लग्नासाठी घरी पाहुणे येणार होते. घरात आनंदाचं वातावरण होतं. फुरकान गेल्या दीड वर्षांपासून पब्जी खेळत होता. तो सतत हा गेम खेळत होता. अनेकदा त्याला आम्ही रोखलं, पण त्याने कधी ऐकलं नाही'.