ॲडमिरल कर्मवीर सिंह नवे नौदलप्रमुख

    दिनांक :31-May-2019
नवी दिल्ली,
ॲडमिरल कर्मवीर सिंह यांनी आज शुक्रवारी भारतीय नौदलाचे प्रमुख म्हणून सूत्रे स्वीकारली. ते चोविसावे नौदलप्रमुख ठरले आहेत.

 
 
नौदलात सुमारे चार दशक सेवा दिल्यानंतर नुकतेच निवृत्त झालेले डमिरल सुनील लांबा यांच्या जागेवर कर्मवीर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावर नियुक्त होण्याआधी ते विशाखापट्टनम्‌ येथील पूर्व नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ होते.
 
दरम्यान, नौदलप्रमुख म्हणून सूत्रे हाती घेताच, कर्मवीर सिंह यांनी, भारतीय नौदलाच्या अत्याधुनिकीकरणाला गती देण्यास प्राधान्य देऊ तसेच नौदलात नव्या युद्धनौका, पाणबुड्या आणि लढाऊ विमानांचा समावेश करण्याची प्रक्रिया आणखी गतीने राबविण्यात येईल, असे सांगितले.
 
चीनचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी भारतीय समुद्रात नौदलाचे अस्तित्व आणखी वाढविण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला. विशेष म्हणजे, या पदावरील त्यांच्या नियुक्तीला अंदमार निकोबार येथील नौदल कमांडचे प्रमुख व्हाईस ॲडमिरल विमल वर्मा यांनी सेवाज्येष्ठतेच्या मुद्यावर आव्हान दिले होते. तथापि, संरक्षण मंत्रालयाने त्यांची आव्हान याचिका फेटाळली होती. त्यानंतर त्यांनी लष्करी लवादाकडे धाव घेतली, पण तिथेही त्यांची निराशाच झाली होती.