बिमस्टेक नेत्यांसोबत पंतप्रधानांची चर्चा

    दिनांक :31-May-2019
- द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर भर

 
नवी दिल्ली,
शपथविधी सोहोळ्याला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीत आलेल्या बिमस्टेक राष्ट्रप्रमुखांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी चर्चा केली. या समूहातील सर्व देशांसोबतचे द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्यावर या बैठकांमध्ये भर देण्यात आला. गुरुवारी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाला सीरिसेना, नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली आणि भूतानचे पंतप्रधान लोटे शेरिंग यांच्यासोबत स्वतंत्रपणे चर्चा केली. यानंतर त्यांनी बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल हमीद आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद जगन्नाथ यांच्याही भेटी घेऊन द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर भर दिला.
 
मोदी आणि सीरिसेना यांच्यातील बैठकीत, दोन्ही नेत्यांनी दहशतवाद समूळ नष्ट करण्यावर विशेष भर दिला. दक्षिण आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सहकार्य आणखी वाढविण्यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जारी एका प्रसिद्धी पत्रकातून दिली.
 
शपथविधी सोहळ्यात सहभागी होऊन, नव्या सरकारला शुभेच्छा दिल्याबद्दल मोदी यांनी बिमस्टेक राष्ट्रप्रमुखांचे आभार मानले. इतर नेत्यांसोबतच्या चर्चेतही पंतप्रधान मोदी यांनी दहशतवादाचा पाडाव करण्यासाठी द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर भर दिला.
...