...तर संरक्षण संबंधावर परिणाम होतील : अमेरिका

    दिनांक :31-May-2019
भारताने रशियाकडून एस-400 प्रणाली खरेदी करू नये
 
 
वॉशिंग्टन,
रशियाकडून एस-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली खरेदी करण्याच्या भारताच्या निर्णयाचे भारत आणि अमेरिकेतील संरक्षण संबंधावर प्रतिकूल परिणाम होतील, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यालयाने दिला आहे.
 
रशियाने विकसित केलेली एस-400 ही जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली जगातील सर्वाधिक अत्याधुनिक प्रणाली असून, सर्वप्रथम चीनने सरकारी पातळीवर करार करून ही प्रणाली रशियाकडून खरेदी केली आहे. आता भारतानेही ही प्रणाली खरेदी करण्यासाठी रशियासोबत गेल्या ऑक्टोबर महिन्यात करार केला. हा संपूर्ण व्यवहार सुमारे 500 कोटी डॉलर्सचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यातील यशस्वी चर्चेनंतर या करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
 
अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍याने गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, रशियाकडून ही अत्याधुनिक प्रणाली खरेदी करण्याचा भारताचा निर्णय महत्त्वपूर्ण असला तरी हा फार मोठा व्यवहार नाही, या भारत सरकारच्या मताशी आम्ही सहमत नाही. भारत अमेरिकेकडूनही शस्त्रास्त्र आणि क्षेपणास्त्र खरेदी करीत असल्याने, रशियासोबतच्या या करारामुळे भारत आणि अमेरिकेतील संबंधावर परिणाम होणार नाही, हा भारताचा दावा चुकीचा आहे. कारण, या करारामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण संबंधावर निश्चितच परिणाम होणार आहे, असे या अधिकार्‍याने सांगितले.
 
काय आहे एस-४००
एस-४०० ही जगातील अत्याधुनिक मिसाइल सिस्टिम असून शत्रूची मिसाइल, फायटर विमाने अचूकतेने टिपण्याची क्षमता या सिस्टिममध्ये आहे. एस-४०० मिसाइल सिस्टिमचा भारताच्या शस्त्रास्त्र ताफ्यात समावेश झाला तर चीन, पाकिस्तानचे हवाई हल्ले विफल करता येतील.