देशाचा अर्थसंकल्प ५ जुलै रोजी सादर होणार

    दिनांक :31-May-2019
नवी दिल्ली, 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर आज नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटपही जाहीर करण्यात आले. मोदींच्या दुसऱ्या इनिंगचा पहिला अर्थसंकल्प ५ जुलै रोजी सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करतील. 
 
निर्मला सीतारामन या देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत. याआधी १९७० ते १९७१ या कालावाधीत इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान आणि अर्थमंत्री म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर पहिल्यांदाच एका महिलेला केंद्रीय मंत्रिमंडळात पूर्णवेळ अर्थमंत्री म्हणून स्थान मिळाले आहे. निर्मला सीतारामन या बजेटमध्ये काय काय समोर आणणार? शेतकऱ्यांसाठी बेरोजगारांसाठी कोणते धोरण समोर आणणार? गरीबांसाठी कोणती योजना आणणार ? या सगळ्याची उत्तरे आता ५ जुलै रोजी मिळणार आहेत.
आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. १७ जून पासून संसदेचे कामकाज सुरू होणार आहे. लोकसभा अध्यक्ष निवडीसाठी १९ जूनला मतदान घेतले जाईल असेही निर्णय या बैठकीत घेण्यात आले.