हक्क मातृत्वाचा

    दिनांक :31-May-2019
डॉ. चैतन्य शेंबेकर
नागपूर
नुकत्याच केलेल्या ट्वीटमध्ये, मी टू चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री लीसा मिलॅनो हिने जॉर्जिया प्रांताच्या नवीन गर्भपात कायद्याविरोधात सर्व स्त्रियांना ‘सेक्स स्ट्राईक’ करण्याचे आवाहन केले आहे. ‘हॅशटॅग सेक्स स्ट्राईक’ सध्या ट्रेंडिंग आहे आणि संदर्भ आहे जॉर्जिया प्रांताचा कायदा ज्याला हार्टट्वीट बिल असंदेखील संबोधतात. अर्थात आता या चळवळीचा उद्देश हा स्त्रीच्या मातृत्वावर तिचाच अधिकार असेल. म्हणजेच गर्भधारणा ठेवायची की नाही, हा निर्णय केवळ आणि केवळ ती स्त्रीच घेईल.
 
अमेरिकेतल्या या कायद्याच्या अनुषंगाने, स्त्रीला बाळाच्या हृदयाचे ठोके सोनेग्राफीमध्ये दिसायला लागल्यानंतर गर्भपात करण्यावर बंदी आणलेली आहे. याचा अर्थ, पाळी चुकल्यानंतर 15 दिवसांच्या आत तुम्ही गर्भपात करू शकता, त्यानंतर नाही.

 
थोडक्यात, गर्भ ठेवायचा की नाही हा अधिकार त्या स्त्रीला राहणार नाही. ॲलीसा मिलॅनोने या कायद्याच्या विरोधात लगेच बंड पुकारले. जोपर्यंत सरकार हा कायदा मागे घेत नाही, तोपर्यंत कुठल्याही स्त्रीने शरीर संबंधांना नकारच द्यावा, असे आवाहन तिने केले आहे. माझ्या शरीरावर केवळ माझाच अधिकार, असा युक्तिवाद तिने केला आहे.
 
जगभरातल्या असंख्य नेटीझन्सनी या ट्वीटला प्रचंड प्रतिसाद दिला. अवघ्या काही वेळातच तिला 35000 च्या वर लाईक्स मिळाले आणि 12000 लोकांनी हा ट्वीट रीट्वीट केला. स्त्रियांच्या दृष्टीने हा मुद्दा किती महत्त्वाचा आहे, हे यावरून सिद्ध होते.
 
अर्थातच, तिच्या या आवाहनाला संमिश्र प्रतिसाददेखील मिळाला. जसे काही लोकांच्या मते, सेक्स स्ट्राईक हा मुद्दाच मुळी आजच्या काळात चुकीचा आहे. शृंगार हा केवळ पुरुषांच्या सुखासाठी असतो असा विचार स्त्रियांनी करू नये, असे उपदेशात्मक ट्वीटस्‌देखील या निमित्ताने पुढे आलेत. गर्भपाताच्या या कायद्याच्या व त्यावरील चर्चेच्या निमित्ताने जगातील इतर देशांमध्ये काय चाललंय्‌, याचे विश्लेषण करणे उचित ठरेल.
या कायद्याला कोर्टात आव्हान करणारे अनेक लोक पुढे आले आहेत. बर्‍याच लोकांना हा कायदा म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला आहे, असे वाटते आणि ते यथोचित आहे. अमेरिकेतील मिसीसीप आणि अगदी अलीकडच्या काळात म्हणजे मागील आठवड्यातच ॲलेबामा या राज्यांमध्ये हा कायदा आणण्याचा प्रयत्न राज्यकर्त्यांनी केला, परंतु तो लोकांनी हाणून पाडला.
 
पोप आणि जगभरातील ख्रिश्चन लोकांचा गर्भपात या प्रकाराला विरोध आहे, हे सर्वश्रुतच आहे आणि त्याच कारणाने या विषयावर दुमत झालेले आहे.
दुबईसह इतर आखाती देशांमध्येदेखील कलम 340 अन्वये गर्भपात करण्यावर सरसकट बंदी आहे. आपणा सर्वांना ज्ञातच आहे की, अरब देशातील कायदे अतिशय कडक असतात व ते मोडणार्‍यांवर सरकार सक्त कारवाई करते.
 
तरीदेखील जगातील दोनतृतीयांश देशांमध्ये गर्भपातावर बंदी नाही. मानसिकदृष्ट्या स्त्री गर्भधारणेस सामोरी जाण्यास उत्सुक नसली, तर भारतासारख्या अनेक देशांमध्ये कायदा गर्भपात करण्यास मुभा देते. याच कारणाने हे देश आधुनिक विचारसरणीचे आहेत, ही बाब सिद्ध होते. 1972 च्या भारत सरकारच्या गर्भपात कायद्याचा आपण अभ्यास केला तर हा मुद्दा अधिक स्पष्ट होईल.
 
आपल्या देशातील हा कायदा स्त्रियांना 20 आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्याला अनुमती देतो. या कायद्यानुसार गर्भपात बर्‍याच कारणांसाठी करता येतो. जसे- बाळाला व्यंग असल्यास किंवा स्त्रीला कुठला गंभीर आजार असल्यास. इतकेच नव्हे, तर कुटुंबनियोजनाची साधने निकामी ठरल्यास किंवा स्त्रीला गर्भधारणा पुढे नेण्याची इच्छा नसल्यासदेखील गर्भपाताची परवानगी आहे. तसेच स्त्रीला आपला जोडीदार अबॉर्शन करतेवेळी सोबत असल्याची आणि जोडीदाराची परवानगी घेण्याचीदेखील आवश्यकता नाही. हा निर्णय स्त्री स्वत: कुणाच्याही दबावाखाली न येता घेऊ शकते. यासंबंधीचे संपूर्ण हक्क तिला देण्यात आलेले आहेत. भारतासारख्या प्रगतिशील राष्ट्राने स्त्री स्वातंत्र्य व स्त्रियांचे हक्क यांना या कायद्याच्या निमित्ताने झुकते माप दिले आहे व हे निश्चितच कौतुकास्पद आहे.
 
आयर्लंडमधील मूळ भारतीय असलेल्या सविताची कथा मन विषण्ण करणारी आहे. 2012 मध्ये रक्तस्राव होत असल्यामुळे गर्भपात करण्याची तिने आणि तिच्या पतीने केलेली मागणी गॅलने येथील युनिव्हर्सिटी इस्पितळाने नाकारली. त्यांच्या मते, आयर्लंडचा कायदा अशाप्रकारच्या गर्भपातास परवानगी देत नाही. त्याचा परिणाम काय झाला? तर काही दिवसांनंतर इन्फेक्शन होऊन सविताचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणानंतर सरकारचे डोळे उघडले व 2013 मध्ये आयरर्लंड सरकारने या कायद्यात सकारात्मक बदल घडवून आणले.
 
आज जग झपाट्याने प्रगती करीत आहे. स्त्रियांच्या बाबतीतदेखील अनेक चांगल्या घडामोडी गेल्या 50 वर्षांत झालेल्या आहेत. 140 वर्षांपूर्वी अगदी पाश्चात्त्य देशांमध्येदेखील पुरुषांची मक्तेदारी होती व स्त्रियांना समाजात दुय्यम स्थान होते.
परंतु, काळ बदलला व स्त्रियांना आपल्या हक्काविषयी जाणीव व्हायला लागली. स्त्रियांचे अधिकार आणि स्त्रीमुक्ती आंदोलनाची सुरुवात 19 व्या शतकात झाली. 20 व्या शतकात या चळवळीने जोर पकडला. 1960 च्या दशकात युरोप आणि अमेरिकेत फेमिनीझमचे वारे वाहू लागलेत. यातच, गर्भपात करायचा किंवा नाही, याचा संपूर्ण अधिकार स्त्रीला मिळावा, असा विचार समोर आला.
 
आज 2019 मध्ये जगभरातील बहुतांश देशांचे कायदे स्त्रियांना झुकते माप देणारे झाले आहेत. त्याकारणाने स्त्रीमुक्ती आंदोलनाचा विशेष संदर्भ राहिलेला नाही. किंबहुना स्त्रियांना अनेक बाबतीमध्ये कायद्याचे इतके संरक्षण मिळायला लागले आहे की, काही स्त्रिया त्याचा गैरफायदा घेऊ लागल्या आहेत. कायदे स्त्रियांच्या बाजूने झाल्याने पुरुषांना त्याचा त्रास होतो आहे का काय, अशी शंका निर्माण होण्याइतके वातावरण बदलत चालले आहे.
 
अगदी मी टू चळवळीलादेखील समाजातील काही लोक याच दृष्टीने बघायला लागलेत. मी टूच्या माध्यमातून काही स्त्रिया जुन्या भांडणांचा हिशेब तर चुकता करीत नाहीत ना, असले विचारदेखील काहींच्या मनात येऊ लागलेत. याचाच परिणाम असेल कदाचित, पण नुकत्याच घडलेल्या एका प्रकरणात अभिनेता करण ओबेरॉयला जेव्हा अटक झाली, त्या वेळी अभिनेत्री पूजा बेदी हिने त्याला संपूर्ण पाठिंबा दिला व मेन टूची चळवळ सुरू केली. तिच्या मते, करण ओबेरॉय हा मी टू प्रकरणात नाहक गोवला गेला.
 
तर या ‘मी टू’ आणि ‘मेन टू’च्या काळात ॲलीसा मिलॅनो हिला सेक्स स्ट्राईक करण्याची वेळ यावी, ही खरोखरीच आश्चर्याची गोष्ट आहे. परंतु हेही तितकच खरं आहे की, अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्येदेखील गर्भपातावर बंदी आणणारे कायदे आणण्याचा प्रयत्न नवीन नाही. किंबहुना अनेक प्रांतांनी अनेक वेळा गर्भपात परवानगी नाकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. बहुतांश प्रसंगी तेथील स्त्रियांनी व सामान्य जनतेने हा प्रयत्न हाणून पाडला आहे व ते योग्यही आहे. परंतु, याबद्दल स्त्रिया आजही पारतंत्र्यातच जगत आहेत, या गोष्टीची जाणीव होते.
 
सरतेशेवटी नाण्याच्या दोन्ही बाजूंचा विचार केल्यानंतर एक बाब स्पष्ट होते. कुठल्याही व्यक्तीने, मग ती स्त्री असो अथवा पुरुष, आपल्या स्त्री किंवा पुरुष असण्याचा गैरफायदा घेऊ नये.
एकमेकांविषयी आदर आणि सामंजस्याची भावना, हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर राज्यकर्त्यांनी स्त्रीस्वातंत्र्याचा मान राखायलाच हवा, नाहीतर समाज त्यांना माफ करणार नाही. ही तर सुरुवात आहे, अजून आपल्याला बरंच पुढे जायचं आहे...
जिंदगी की असली उडान अभी बाकी हैं,
जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकी हैं,
अभी तो नापी हैं मुठ्ठीभर जमीन हमने,
अभी तो सारा आसमान बाकी हैं...!