नात्यांची समृद्धी!

    दिनांक :31-May-2019
उज्ज्वला वि. पाटील
 
नात्यांचे ‘इंद्रधनुष्य’ आपल्या भारतीय कुटुंबाइतकं इतर कुठेही दिसत नसावं! सगळ्या नात्यांचं मोठेपण कशात आहे, असा प्रश्न मनात आला आणि त्याचे उत्तर शोधता शोधता या नात्यांचे कित्येक गर्भरेशमी पदर उलगडत गेले... आणि त्यात नात्यांची श्रीमंतीही दिसत गेली. फार पूर्वीचे मला अजिबात सांगायचे नाहीये! अगदी अलीकडचे म्हणजे गेल्या 20-25 वर्षांतले हे बदल आपण लक्षात घेतले- तर खूप सार्‍या सकारात्मक गोष्टी जाणवायला लागतात.
 
‘सून’ म्हणून येणार्‍या नवीन मुलीचा आनंदानं केलेला स्वीकार, तिच्या मतांना व विचारांना दिलेली पसंती, तिने घरात सुचवलेले व केलेले बदल सहज स्वीकारणारं घर, तिच्या मोकळ्या व स्पष्ट बोलण्यातून होणारे विविध भावनांचे दर्शन व ते भाव समजून घेणारे घर, तिच्या पार्ट्या-मैत्रिणी, बाहेर जाणे, घरातला हास्यविनोद याला दाद देणारे घर, तिच्या फॅशन-मेकअप व वागण्या-बोलण्यावर सहसा आक्षेप न घेणारे.... अशा अनेक गोष्टी कुटुंबात दिसताहेत आणि हे नातं श्रीमंत करीत आहे. सासरची मंडळी आपला हेका-हट्ट बाजूल ठेवताहेत आणि सूनही आपल्या पतीच्या रक्ताची नाती जपतेय्‌. दोन्ही बाजू आपापल्या परीनं हे नातं आणखी सुदृढ-घट्ट-समृद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

 
 
‘सासू’ झाल्यावर मध्यंतरीच्या काळात जरी वेगळे चित्र होते तरी आज हे चित्र खर्‍या अर्थाने सुखकर आहे. सासू-सून, अगदी आई-मुलीच्या नात्याने नव्हे तर मैत्रिणींच्या नात्याने नक्कीच जवळ आल्या आहेत. सासूच्या भूमिकेत असूनही ती सुनेच्या मनाचा, आवडींचा, छंदांचा विचार करतेय्‌ आणि तिला ‘फुलायला’शक्य तेवढी मदत नक्कीच करतेय्‌. 3 वाजेपर्यंत शाळेतून आले- पाणी प्यायले की मस्त झोप घ्यायची असे ठरवून सून घरी आली की, सासू दुपारचा चहा आणि आवडीचे खायला करायची तयारी ठेवते; तिला सुनेची तडतड-धावपळ दिसतेय्‌ आणि समजतेय्‌! सुनेच्या भावनांची कदर करणं, माहेरच्या लोकांना जपणे, तिच्या आवडीनिवडी लक्षात ठेवणं, थोडे थोडे मॉडर्न होणं, वेळप्रसंगी योग्य सल्ला देणं आणि कधी अलिप्त रहाणं हे आज सासूला जमायला लागलय्‌!
 
पती-नवरा-धनी-हबी, अशी असंख्य शब्दांची अलंकृत झालेली व्यक्ती आज खर्‍या अर्थाने सखा-जीवलग-मित्र बनलेला दिसतोय्‌. आपल्या आयुष्यातील पत्नीचे स्थान आणि महत्त्व त्याने जाणले आहे. संसार फक्त तिचाच नाही तर माझाही आहे. या भावनेने तो घरातही अनेक कामांमध्ये तिला मदत करतोय्‌. लहान बाळाचे लंगोट बदलणे, रात्री जागणे, दूध तयार करून बॉटलमध्ये भरून ते बाळाला पाजणे, मुलांना अंघोळ घालणे, कपडे बदलवणे, चहा करणे, भाजी चिरून देणे, कणिक भिजवणे, वॉशिंग मशीन लावून कपडे वाळत घालणे. यासारखी अनेक कामे तो करतो आणि नोकरीही करतो. बायकोच्या सगळ्या अपेक्षा-इच्छा-स्वप्न पूर्ण करण्याचा तो मनापासून प्रयत्न करतो, तिच्या मनाचा व मूडचा तो कायम विचार करतोे. तिच्या किटी पार्टीज, भीसीच्या वेळी मुलांना तो सांभाळतो... म्हणूनच त्याने आपले नाते आणखी समृद्ध-प्रगल्भ केले, असे जाणवते. समजून घेण्याच्या ‘कक्षा’ नक्कीच रुंदावल्या आहेत.
 
सासरा-घरातील ती मोठी व्यक्ती! आज त्यांनी आपल्या ‘मोठेपणाच्या’ रंगात ‘आपुलकीचा-स्नेहाचा’ रंग मिसळला आहे. ते आता सुनेचे बाबा झालेत. लेकीप्रमाणे तिच्यावर प्रेम करणारे, वेळप्रसंगी तिच्या बाजूने उभे राहणारे, घरातल्या वस्तू आणण्यासाठी बाजारात जाणारे, घरी कुणी मैत्रिणी आल्या तर हळूच पायात चप्पल अडकवून फिरायला जाणारे, घरातल्यांच्या आवडीचा विचार करून कधी आंबे, आईस्क्रीम, भेळ, सफरचंद, पेरू असे आवर्जूून घेऊन येणारे, आवडीने वाढदिवसांना भेटवस्तू अथवा पैसे देणारे बाबा- स्वत:चे अस्तित्व नक्कीच समृद्ध करताना दिसताहेत! घरातल्या चर्चेला किंवा वादाला एक सकारात्मक आणि विनोदी वळण देण्याचा प्रयत्न करून वातावरण हलके करण्याचा प्रयत्नही करताना दिसताहेत... हीच या नात्याची समृद्धता नाही का?
 
नणंद-एक खाष्ट नातं! पण ती सुद्धा बदललीय्‌ यात शंकाच नाही. ती आता भाऊ-वहिणीच्या नात्यात गोडवा आणण्याचा प्रयत्न करते. वहिनी कशीही वागली तरी भावाकडे तक्रार करीत नाही. त्या दोघांचा संसार सुखाचा व्हावा याचसाठी ती वेळप्रसंगी स्वत: वाईट होते. भावापेक्षा वहिणीच्या भावना व आवडीनिवडी जपण्याचा प्रयत्न करते. आपल्या आईला वहिनीशी चांगले वागण्याचा तिच्या चुकांकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला देते. आपले स्थान, अस्तित्त्व आणि व्यक्तिमत्त्व समृद्ध करण्याचे तिचे प्रयत्न विचारात घेतलेच पाहिजेत. वहिनीशी शक्यतोवर मैत्रीचे आपुलकीचे संबंध ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न, वहिनीच्या अडचणी किंवा घरातल्या कुरबुरी ऐकून त्यातून मार्ग काढण्यासाठी सल्ला, कधी प्रेमाने कधी हक्काने तिला तिच्या चुकांची जाणीव करून देणं हे ती अतिशय समर्थपणे करतेय्‌. सगळ्या नात्यांमध्ये हे नातं अतिशय ‘तारेवरची कसरतीच’... येणार्‍या नवीन मुलीला हे घर ‘आपलं’ वाटावं यासाठी ती नक्कीच मनापासून प्रयत्न करतेय्‌... ही समृद्धताच आहे ना त्या नात्याची?
 
वहिनी-काकू-जाऊ-आत्या-मामी-आजी या सगळ्या नात्यांनीही आपला समजूतदारपणाचा परीघ वाढलाय्‌. आपल्या नात्याची मर्यादा त्यांनी ओळखलीय्‌. मुख्य म्हणजे आपल्या नात्यात एक मोकळेपणा आणण्याचा प्रयत्न दिसतोय्‌. कुणी कुणाच्या संसारात ढवळाढवळ करीत नाही, मात्र वेळप्रसंगी मदत करण्याची तयारी असतेच. हा मैत्रीचा ‘परीसस्पर्श’ झालेला आहे; म्हणून ही नाती आणखी घट्ट-हवीहवीशी वाटायला लागली आहेत. कौटुंबिक प्रसंगी एकत्र आल्यावर या नात्यांची मै3ील रंगते आणि संबंध अधिक दृढ होताना दिसतात. दूर असूनही मनाने जवळ असण्याची किमया साधलीय आज या सर्व नात्यांना!
 
भावभावनांचे बावनकशी सोने या नात्यांमध्ये बघायला मिळते. या नात्यांची समृद्धी-प्रगल्भता आणि म्हणूनच श्रीमंती नक्कीच वाढली आहे. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आपले वडील, मामा, काका, दादा, लहान भाऊ-बहिणी, इतर भावंडे यांच्या नात्यांची पण गर्भश्रीमंती वाढली आहे. समजूतदारपणा, ब्रॉडमाईंडेडनेस, स्वीकारार्हता, विश्वसनियता, सहानुभूती, प्रेम, आपुलकी, मदत याबरोबरच असणारी प्रसन्नता व हजरजबाबीपणा, प्रसंगसूचकता, अवेअरनेस, अलर्टनेस यासारख्या गुणांच्या समृद्धतेने नटलेली ही नाती आज आपण पहातो आहोत. एकेकाळी केवळ भावना आणि कर्तव्य या दोनच स्तंभांवर तोलली व निभावली जाणारी नाती आज या अनेक गुणांच्या साखळीने बांधली जाताहेत- घट्ट होताहेत आणि समृद्ध होताहेत. तुम्हाला नाही का असे वाटत? पहा असा विचार करून!!