पहिल्या सामन्यात वॉर्नर खेळण्याचा ऑस्ट्रेलियाला विश्वास

    दिनांक :31-May-2019
लंडन, 
 
पायाच्या दुखण्याने त्रस्त असलेला सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर येत्या 1 जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणार्‍या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या सामन्यात खेळू शकतो, असा विश्वास ऑस्ट्रेलिया संघातील अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.
 
 
 
 
 
पायाच्या दुखापतीमुळेच वॉर्नर श्रीलंकेविरुद्ध सोमवारी झालेल्या सराव सामन्यात खेळू शकला नव्हता. त्याच्या जागी उस्मान ख्वाजाने डावाची सुरुवात केली होती आणि 89 धावा काढल्या होत्या.
 
एका वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियाच्या काल बुधवारी ब्रिस्टल येथे झालेल्या सराव सत्रात वॉर्नर सहभागी झाला होता आणि त्याने फलंदाजीचाही सराव केला होता. मात्र, पहिल्या सामन्यातील त्याच्या खेळण्याबाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे.
 
वॉर्नर तंदुरुस्त झाला तरी त्याला अंतिम अकरात स्थान द्यायचे की नाही, याबाबतचा निर्णय प्रशिक्षक जस्टिन लँगर आणि निवड समिती सदस्यांवर अवलंबून राहणार आहे.
 
दक्षिण आफ्रिकेत झालेल्या सॅण्डपेपर वादात सहभागी असल्याचे सिद्ध झाल्यामुळे वॉर्नरला एक वर्षाच्या बंदीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. तो कालावधी आटोपल्यानंतर वॉर्नर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय कि‘केटमध्ये परतला आहे. याशिवाय त्याने भारतात झालेल्या आयपीएल स्पर्धेत सहभागी होताना 12 सामन्यांमध्ये एकूण 692 धावा काढल्या होत्या.