भाजपाचा विजय आणि अमर्त्य सेन...

    दिनांक :31-May-2019
नमम  
 
 श्रीनिवास वैद्य 
 
मनाची प्रक्षुब्ध अवस्था असली की व्यक्तीची मूळ वृत्ती बाहेर पडते, असे म्हणतात. अमर्त्य सेन यांच्या बाबतीतही असेच काहीसे घडले आहे. अमर्त्य सेन म्हणजे परदेशात आपली बुद्धिमत्ता विकून अमाप संपत्ती गोळा करणारे एक अर्थशास्त्री. त्यांना म्हणे अर्थशास्त्रात काही लुडबुड केली म्हणून नोबेल पारितोषिक मिळाले आहे. सर्वसामान्य भारतीयांना कल्पनाही करता येणार नाही इतके काठोकाठ भरलेले सुखासीन आयुष्य परदेशात जगणार्‍या या अर्थशास्त्रीची अपेक्षा असते की, मी जे काही उपदेशाचे घोट भारताला पाजीन, ते त्याने मुकाट गिळले पाहिजे. हे सर्व इतके नमनाला घडाभर तेल ओतण्याचे कारण म्हणजे, एवंगुणविशिष्ट अमर्त्य सेन यांनी, लोकसभेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालावर एक लेख लिहिला आहे- जिंजग ए व्हिक्टरी! (विजयाची पारख). या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील रालोआला प्रचंड बहुमत मिळाले म्हणून अमर्त्य सेन प्रक्षुब्ध आहेत. संतापले आहेत आणि हा संताप त्यांनी या लेखाद्वारे फसव्या शब्दांनी मोठ्या शहाजोगपणे प्रकट केला आहे. अमर्त्य सेन म्हणतात की, भाजपाने आपल्या या विजयाला नीट पारखले पाहिजे. कारण लोकशाहीला मतमोजणीहून अधिक व्यापक गोष्टीची अपेक्षा असते. सोप्या भाषेत सांगायचे, तर मतमोजणीमुळे मिळालेला विजय खरा विजय नाही, या विजयाबाबत इतर लोक काय म्हणतात, हे महत्त्वाचे. आता हे लोक म्हणजे कोण? अमर्त्य सेन म्हणतात, भाजपाच्या या विजयावर जगभरातून मीडियाच्या (म्हणजे न्यू यॉर्क टाइम्स, वॉिंशग्टन पोस्ट, वॉल स्ट्रीट जर्नल, गार्डियन, ऑर्ब्जव्हर, ली मॉण्डी, डाय झेत, हारेट्‌झ, बीबीसी व सीएनएन) ज्या प्रतिकूल व वाईट प्रतिक्रिया आल्या आहेत, त्याचा नरेंद्र मोदी यांनी गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. मुसलमानांना भीक न घालता भाजपाने हा प्रचंड विजय मिळविला असल्यामुळे अमर्त्य सेन यांना अतीव दु:ख झाले आहे. विदेशी मीडियात, आता भारतातील मुसलमानांचे काय होणार, या प्रश्नावरून भाजपाच्या या निर्भेळ विजयाला कलंकित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा एकप्रकारे भारतीय लोकशाहीचा आणि पर्यायाने भारतीय जनतेचा अपमान आहे. असे असूनही अमर्त्य सेन मात्र विदेशी मीडियाच्या प्रतिक्रियेमुळे अत्यंत प्रक्षुब्ध झाले आहेत.
 
 
 
आपल्या लेखात सेन म्हणतात की, भाजपाने लोकसभेच्या बहुसंख्य जागा जिंकल्या असल्या, तरी या पक्षाला फक्त 37 टक्केच मते मिळाली आहेत. म्हणजे भाजपाला बहुसंख्य जागा मिळाल्या असल्या तरी बहुसंख्य मते मिळाली नाहीत. असो. राजीव गांधींना बहुसंख्य मते मिळाली होती का? मालकीण सोनिया गांधींच्या सरकारला बहुसंख्य मते होती का? असले प्रश्न जर कुण्या शाळकर्‍याने सेन यांना विचारले तर त्यांची किती पंचाईत होईल? नंतर या लेखात अमर्त्य यांनी, विरोधी पक्षांनी भाजपाविरोधात युती करण्यास किती अनास्था दाखविली आहे आणि ती दाखविली नसती, आपापला अहंकार बाजूला ठेवला असता, तर आज चित्र वेगळे राहिले असते, याचे सविस्तर वर्णन केले आहे. अर्ध्या लेखानंतर सेन यांनी भाजपाचा हा विजय किती क्षुद्र आणि उथळ आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. तत्त्ववेत्त्याचा आव आणत ते म्हणतात की, निवडणूक लढविताना जिंकणे हा केवळ एकच मुद्दा असायला नको. निवडणुकीनंतर जेत्याकडे जग कसे बघते, हे अधिक महत्त्वाचे आहे. अमर्त्य सेन यांच्या मते, विदेशी मीडिया म्हणजेच जग. असे असेल तर मग जगातील यच्चयावत राजकीय प्रभावशाली नेते नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करत आहेत, मोदींच्या नेतृत्वातील भारताशी मित्रत्वाचे, सहकार्याचे संबंध निर्माण करण्यास आतुर झाले आहेत, याला काहीच अर्थ नाही काय? ज्या विदेशी मीडियाचा अमर्त्य सेन दाखला देतात तो मीडिया विकला गेलेला नाही, याची खात्री सेन देऊ शकतात का?
दुसरे म्हणजे प्रचारात भाजपाला झुकते माप देण्यात आले, या गोष्टीचे सेन यांना दु:ख झाले आहे. विशेषत: न्यूज चॅनेलवर इतर पक्षांपेक्षा भाजपाला अधिक वेळ मिळाला. सेन यांच्या आकडेमोडीवरून भाजपाला कॉंग्रेसपेक्षा दुप्पट वेळ मिळाला आहे. संसाधनांच्या बाबतीतही भाजपा कॉंग्रेसपेक्षा भरपूर पुढे असल्याचे सेन यांना दु:ख झाले आहे. अशा सर्व वेदना प्रकट करून सेन लेखाच्या शेवटी म्हणतात की, भाजपाला जे हे यश मिळाले आहे ते या असल्या असमतोलामुळे झाकाळून गेले आहे. विजयी पक्षाने कशा प्रकारची कारकीर्द करायची आहे, तसेच आपल्या कारकीर्दीकडे जग कसे बघेल याचाही विचार केला पाहिजे.
अमर्त्य सेन यांचे विचार हे एका व्यक्तीचे विचार नसून, ही एक सर्वत्र असलेली वृत्तीच आहे. ज्या लोकशाहीप्रक्रियेतून, लोकशाही संस्थांच्या माध्यमातून आतापर्यंत कॉंग्रेसने विजय मिळविला आणि इतकी वर्षे सत्ता भोगली, हे यांना अजीबात खटकत नाही. परंतु, जेव्हा त्यांचा वैचारिक विरोधक असलेल्या भाजपाने याच लोकशाहीप्रक्रियेतून, याच लोकशाही संस्थांच्या माध्यमातून विजय प्राप्त केला तर ही मंडळी लगेच त्या प्रक्रियेवर, त्या लोकशाही संस्थांवर प्रश्न उपस्थित करू लागतात. इतकेच नाही, तर ती प्रक्रिया व त्या लोकशाही संस्था यांची जनमानसातील विश्वासार्हताच नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू करतात. भारतीय जनता कॉंग्रेसला विजयी करत असेल तर तो लोकशाहीचा विजय असतो. भारतात लोकशाही परिपक्व झालेली असते आणि जर याच जनतेने कॉंग्रेसला झिडकारून भाजपाला निवडून दिले तर लगेच ती जनता अशिक्षित, गावंढळ, घोषणांना फसणारी, अतिरेकी होऊन जाते. अशा प्रतिक्रिया परिवारवादी राजकीय पक्षांकडून आल्या तर एकवेळ समजूनही घेता येईल. परंतु, अमर्त्य सेन यांच्यासारख्या कथित बुद्धिवंताकडून जेव्हा त्या येतात तेव्हा यांच्या विद्वत्तेवर शंका यायला लागते. या लोकांनी स्वत:ला लावून घेतलेली उदारमतवादी, तर्कप्रिय, सहिष्णू इत्यादी बिरुदे फसवी आहेत की काय, असे वाटू लागते. जनतेने दिलेला कौल खिलाडूवृत्तीने स्वीकारण्याइतकेही यांचे मन मोठे नाही का? सतत विदेशात राहिल्यामुळे तसेच विदेशी मलिदा सतत खाल्ल्यामुळे भारताकडे बघण्याची आपली दृष्टी बाधित होऊ शकते, याची यांना जाणीव होत नसेल का? असे प्रश्न मनात येऊ लागतात. त्यानंतर यांना मिळालेले मानसन्मान, पुरस्कार लांगूलचालन करूनच मिळविले असले पाहिजे, याची खात्री पटत जाते.
खरे म्हणजे, ‘नोबेल’प्राप्त व्यक्तीकडून इतक्या उथळ लेखाची अपेक्षा नव्हती. आपला विषय अर्थशास्त्र आहे. त्यातच काय लावायचे ते दिवे लावायला हवेत. तेही यांना जमत नाही. 10 वर्षे त्यांच्या मालकिणीची सत्ता भारतात होती. या काळात भारताच्या अर्थव्यवस्थेचे शेण करून ठेवले. पंतप्रधान अर्थतज्ज्ञ होते तरीही. अशा वेळी अमर्त्य सेन यांना आपली अर्थशास्त्रीय बुद्धी वापरून भारताला आर्थिक समृद्धीच्या शिखरावर आणून ठेवता आले असते. परंतु, हे त्यांना जमले नाही? भाजलेल्या बियांसारखी यांची बुद्धी झाली आहे. भारत काय आहे हेदेखील यांना समजलेले दिसत नाही. भारत समजून घ्यायला एक वेगळी दृष्टी आणि बुद्धी आवश्यक असते.
परक्यांच्याच अन्नावर देह पोसला जात असेल, तर मन आणि बुद्धीदेखील त्यांचेच हित जोपासू लागते. असले विद्वान आपल्याकडे नवीन नाहीत. एक जगन्नाथ पंडित होऊन गेले म्हणतात. त्यांचा एक श्लोक प्रसिद्ध आहे-
दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो वा मनोरथान्‌ पूरयितुं समर्थ:।
अन्यैर्नृपालै: परिदीयमानं शाकाय वा स्यात्‌ लवणाय स्यात्‌।।
(कवी म्हणतो, माझ्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यास एकतर दिल्लीपती समर्थ आहे किंवा परमेश्वरातच ते सामर्थ्य आहे. इतर राजांनी दिलेले द्रव्य मला भाजीला किंवा मिठालाच पुरेल.)
जगन्नाथ पंडितांच्या काळात दिल्लीच्या मोगल बादशाहीच्या प्रभुत्वाचा पगडा हिंदुस्थानावर किती विपरीत व विलक्षण होता हे, ही उक्ती स्पष्ट करते. हिंदूंच्या पारंपरिक दुबळ्या दास्यवृत्तीचा हा हीन नमुना आहे. परमेश्वरासारखे अद्वितीय कर्तृत्व व सामर्थ्य परकीय सत्ताधार्‍यांच्या ठिकाणीच असणार, हिंदू राजांच्या ठिकाणी ते संभवतच नाही, अशी दास्यवृत्तीची दुबळी भावना बर्‍याच विद्वानांच्या ठायी असते. अमर्त्य सेनही याच माळेतील मणी आहेत...
9881717838