आर्सेनलला नमवून चेल्सीने पटकाविले विजेतेपद

    दिनांक :31-May-2019
बकू (अझरबैजान) : चेल्सी संघाने युरोपा लीग फुटबॉल स्पर्धेतील एकतर्फी निकाली लागलेल्या अंतिम सामन्यात आपला परंपरागत प्रतिस्पर्धी आर्सेनलचे आव्हान 4-1 असे मोडून काढले आणि जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. बेल्जियमचा स्टार खेळाडू ईडन हैजार्ड याने दोन केले आणि एक गोल करण्यात सहकार्य केले. इंग्लिश संघाकडून त्याचा हा शेवटचा सामना असल्याचे बोलले जात आहे. कारण, तो स्पॅनिशच्या दिग्गज रियल माद्रिद क्लबमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.
 
 

 
 
 
चेल्सी संघाने कारकीर्दीत पाचव्यांदा युरोपीयन स्पर्धेचा अंतिम सामना जिंकला असला तरी या संघाचे प्रशिक्षक मॉरिजियो सारी यांच्या कारकीर्दीतील प्रशिक्षक म्हणून हे पहिलेच विजेतेपद आहे. कोणत्याही सामन्यात पराभव न झालेला युरोपा लीगमधील चेल्सी पहिला संघ ठरला. चेल्सीचे इतर दोन गोल ऑलिव्हर जिरू आणि प्रेडो यांनी केले. या दोन्ही गोलमुळेच चेल्सीला सामन्यात 2-0 अशी आघाडी घेता आली होती. विजयी संघाचे नंतरचे दोन गोल हैजार्डने नोंदविले. पराभूत संघाचा एकमेव गोल 69 व्या मिनिटाला अॅलेक्स इव्होबी याने केला. चेल्सीने याआधी हे जेतेपद 2013 साली पटकाविले होते.