राष्ट्रवादीचे कॉंग्रेसमध्ये विलीनीकरण नाही : सुप्रिया सुळे

    दिनांक :31-May-2019
अहमदनगर,
कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल गुरुवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी हा पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन होणार, अशी चर्चा सुरू झाली होती. या विलीनीकरणाची शक्यता मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फेटाळून लावली आहे. राष्ट्रवादीचे कॉंग्रेसमध्ये विलीनीकरण या अफवा आहेत. आमची अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. ही चर्चा फक्त प्रसार माध्यमांमध्ये आहे, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी विलीनीकरणाबाबतच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या.
 
 
 
लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याइतक्याही जागा कॉंग्रेस मिळालेल्या नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीला कॉंग्रेसमध्ये विलीन केल्यास विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याएवढ्या जागा होऊ शकतील. या पृष्ठभूमीवर कॉंग्रेसकडून राष्ट्रवादीला विलीनीकरणाचा प्रस्ताव दिला गेल्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी हा पक्षच कॉंग्रेसमध्ये विलीन झाल्यास देशाच्या राजकारणाला नवी कलाटणी मिळू शकते, असे झाल्यास सुप्रिया सुळे यांच्या गळ्यात लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची माळ पडू शकते, अशीही एक वेगळी चर्चा सुरू झाली आहे.
 
निर्णय परस्पर घेता येणार नाही : उदयनराजे
विलीनीकरणाच्या चर्चेबाबत खासदार उदयनराजे भोसले यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी असा निर्णय परस्पर घेता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडली. विलीनीकरण करायचे झाले तर कोणासोबत करायचे आणि का करायचे, याबाबत विचारविनिमय होणे गरजेचे आहे. मला याबाबत काही माहिती नाही आणि आमच्याशी याबाबत चर्चाही झालेली नाही. याबाबतचा जो निर्णय असेल तो चर्चा करूनच घेतला जाईल, परस्पर निर्णय घेता येणार नाही, असेही ते म्हणाले.
  
गुरुवारी राहुल गांधी यांच्यासोबत भेट झाल्यानंतर पत्रकारांनी राष्ट्रावादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विलीनीकरणाच्या चर्चेबाबत विचारले होते. या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात जे झाले त्याची तपशीलवार माहिती घेतली. याशिवाय महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार असल्यामुळे त्यासंदर्भात चर्चा झाल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची आपणास ऑफर आहे का, असे विचारले असता कॉंग्रेसमध्ये नेतृत्वाची कमतरता भासत असावी, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
दरम्यान, विलीनीकरण झाल्यानंतर कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा शरद पवार यांच्या खांद्यावर सोपविली जाऊ शकते, असाही एक भाग या चर्चेत असल्याची माहिती आहे.