विश्वचषकात प्रथमच पाहायला मिळतील 'हे' पाच बदल!

    दिनांक :31-May-2019
वर्ल्ड कप स्पर्धेला जोरदार सुरुवात झाली आहे. ओव्हल येथे सलामीचा सामन्यात इंग्लडने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले . 30 मे ते 14 जुलै या कालावधीत इंग्लंड आणि वेल्स येथील 11 स्टेडियम्सवर एकूण 48 सामने खेळली जातील. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे.
 
 
 

 
 
 
 
पण, यंदाची वर्ल्ड कप स्पर्धा ही या पाच कारणानं वेगळी असणार आहे. इंग्लंड पाचव्यांदा वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद भूषवित आहे. यापूर्वी त्यांनी 1975, 1979, 1983 आणि 1999 मध्ये वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन केले होते. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पाच अशा गोष्टी आहेत की ज्या प्रथमच पाहायला मिळतील.
१. वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच दहा संघ सहभागी होणार आहेत. यापूर्वी 1975 ते 1987 दरम्यान झालेल्या चार वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये 8 संघांचा सहभाग होता. 1992 मध्ये 9, 1999 मध्ये 12, 2003 मध्ये 14 , 2007 मध्ये 16 आणि 2011 व 2015 मध्ये 14-14 संघांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे प्रथमच अव्वल 10 देशांमध्ये होणारी ही पहिलीच वर्ल्ड कप स्पर्धा आहे
 
२. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये प्रथमच संलग्न संघ सहभागी झालेले नाहीत. 1975च्या वर्ल्ड कपमध्ये पूर्व आफ्रिका व श्रीलंका, 1979मध्ये श्रीलंका व कॅनडा, 1983मध्ये झिम्बाब्वे, 1987 व 1992 मध्ये झिम्बाब्वे, 1996 मध्ये केनिया, नेदरलँड्स व संयुक्त अरब अमिराती, 2003मध्ये केनिया, कॅनडा, नामिबिया व नेदरलँड्स, 2007 मध्ये बर्म्युडा, कॅनडा, केनिया, आयर्लंड, नेदरलँड्स आणि स्कॉटलँड, 2011 मध्ये कॅनडा, आयर्लंड, केनिया व नेदरलँड्स, 2015मध्ये आयर्लंड, अफगाणिस्तान, स्कॉटलँड आणि संयुक्त अरब अमिराती या संलग्न संघांनी सहभाग घेतला होता.
 
३. 'वर्ल्ड कप स्पर्धेत प्रथमच पूर्ण सदस्य असलेल्या दोन सदस्यांना मुख्य स्पर्धेत स्थान पटकावण्यात अपयश आले. झिम्बाब्वे व आयर्लंड हे पूर्ण सदस्य आहेत.
 
४. इंग्लंडमध्ये प्रथमच वर्ल्ड कप स्पर्धेत डे नाईट सामन्याचे आयोजन होणार आहे. 1979 सालापासून वन डे क्रिकेटमध्ये डे नाईट सामने खेळवण्यास सुरूवात झाली. 1992साली वर्ल्ड कप स्पर्धेत पहिला डे नाईट सामना खेळवण्यात आला. पण, इंग्लंडमध्ये प्रथमच वर्ल्ड कप स्पर्धेत डे नाईट सामना खेळवण्यात येणार आहे. इंग्लंडने 1975, 1979, 1983 आणि 1999 मध्ये वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन केले होते. पण, तेव्हा डे नाईट सामने खेळवण्यात आले नव्हते. यंदा एकूण 7 डे नाईट सामने खेळवण्यात येणार आहेत.
 
५. धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप स्पर्धेत मागील 18 सामन्यांत एकदाही पराभवाचे तोंड पाहावे लागलेले नाही. 23 मे 1999 मध्ये त्यांना पाकिस्तानविरुद्ध धावांचा पाठलाग करताना अपयश आले होते.