गोंडवानाच्या विद्यार्थ्यांना नागपूर विद्यापीठातही प्रवेश

    दिनांक :31-May-2019
 20 टक्के जागा राखीव
 
नागपूर
गोंडवाना विद्यापीठातील पदवीधर विद्यार्थ्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश देण्याचे धोरण नागपूर विद्यापीठाने स्वीकारले आहे. त्यानुसार यंदाही गोंडवानाच्या विद्यार्थ्यांना नागपूर विद्यापीठात 38 अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी एकूण जागांच्या 20 टक्के जागा केवळ गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
गोंडवाना विद्यापीठातील पदवीधरांना नागपूर विद्यापीठाच्या 38 विभागांमध्ये 20 टक्के जागा आरक्षित ठेवण्याबाबत राज्यपाल सी. एच. विद्यासागर राव यांनी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांना आदेश दिले होते. या आदेशाचे यंदाही पालन हेणार आहे. ऑगस्ट महिन्यात गोंडवानाच्या विद्याथ्यार्र्ंसाठी 20 टक्के जागांवर प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
 
 
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या विकासकामांचा आढावा घेतल्यावर गोंडवाना विद्यापीठात पदव्युत्तर विभाग नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेथील विद्यार्थ्यांना नागपूर विद्यापीठातील पदव्युत्तर विभागात 20 टक्के अतिरिक्त जागा निर्माण करून प्रवेश देण्यात यावा, असा मुद्दा त्यावेळी उपस्थित करण्यात आला होता. त्यानुसार शैक्षणिक सत्रात राज्यपालांनी तसे आदेश दिले होते तसेच गोंडवाना विद्यापीठात सर्व विद्याशाखांचे पदव्युत्तर विभाग सुरू होईपर्यंत हे आदेश कायम राहतील, असेही आदेशात नमूद केले होते. कुलपतींच्या आदेशानंतर नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने केवळ एकाच शैक्षणिक सत्राकरिता गोंडवानाच्या विद्यार्थ्यांसाठी जागा आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला. राज्यपाल कार्यालयाकडून पुढील आदेशापर्यंत सदर आरक्षण कायम राहील, असे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे यंदाच्या नव्या शैक्षणिक सत्रातही गोंडवानाच्या पदवीधर विद्यार्थ्यांना नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे, असे कुलगुरू डॉ. काणे यांनी सांगितले. विद्यापीठाने विज्ञान व तंत्रज्ञान, मानव्यशास्त्रे आणि आंतरविद्याशाखा कोर्सेसमध्ये 20 टक्के अतिरिक्त जागा निर्माण केल्या आहेत. त्यात विज्ञान व तंत्रज्ञान शाखेत आठ विभागांमध्ये 59 जागा, मानव्यशास्त्रे विद्याशाखेतील आठ विभागांमध्ये 92 जागा, आणि आंतरविद्याशाखा कोर्सेसच्या तीन विभागांमध्ये 62 जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागपूर विद्यापीठाने गोंडवानातील पदवीधरांसाठी एकूण 213 जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या जागा यंदाही कायम राहणार आहेत.
गोंडवाना विद्यापीठाने राज्य सरकारकडे 22 पदव्युत्तर विभाग सुरू करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. त्या प्रस्तावासोबतच सुमारे 120 हून अधिक शिक्षक नियुक्तीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. शिक्षक नियुक्तीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठाने यूजीसीला 12 (एफ) ची मान्यता मिळाली, असा प्रस्ताव पाठवला होता. आदिवासी व दुर्गम भागातील विद्यापीठाला यूजीसीची मान्यता नसल्याने विकास अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे विशेष बाब म्हणून यूजीसीने मान्यतेसाठी तज्ज्ञ समिती विद्यापीठात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काही महिन्यात यूजीसीची चमू गोंडवाना विद्यापीठाला प्रत्यक्ष भेट देणार असून, त्यानंतर पुढील प्रक्रिया करण्यात येणार आहे.