हॉटेल हरदेवच्या मालकाकडून ५० लाख उकळण्याचा प्रयत्न

    दिनांक :31-May-2019
-चतूर नोकरच निघाला खंडणीबाज
-तंत्रज्ञानाच्या मदतीने लागला छडा
 
नागपूर: मुलाचे अपहरण करण्याची धमकी देत प्रसिद्ध मद्य व्यावसायी आणि हॉटेल हरदेवचे मालक विशाल जयस्वाल यांच्याकडून ५० लाख खंडणी उकळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी वाडी पोलिसांनी गुप्तता बाळगत जयस्वाल यांच्याकडे कामाला असलेल्या एका नोकराविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. 
 
 
 
विशाल जयस्वाल यांचे धंतोली हद्दीत हॉटेल हरदेव आहे. त्याचप्रमाणे त्यांचा मद्याचा व्यवसाय आहे. जयस्वाल यांचे वाडी हद्दीत श्रीराम सेल्स कार्पोरेशन नावाचे गोदाम असून त्यात ते मद्याचा साठा करतात. याशिवाय जयस्वाल यांचे शहरात अनेक ठिकाणी मद्याची दुकाने आणि बियर बार आहेत. १४ मे रोजी जयस्वाल यांच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीने फोन करून त्यांच्या मुलाचे अपहरण करण्याची धमकी देत त्यांना ५० लाखांची मागणी केली होती. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून खंडणीसाठी फोन येत होते. वारंवार फोन येत असल्याने जयस्वाल त्रस्त झाले होते. जयस्वाल यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाèयांशी संपर्क साधून त्यांना ही माहिती दिली. प्रकरण गंभीर असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल न करता या प्रकरणाचा छडा लावण्याचे ठरविले. पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने जयस्वाल यांना आलेल्या फोन क्रमांकाचा शोध घेतला असता ते सीम कार्ड अतुल ठवरे याच्या नावे असल्याचे लक्षात आले. याप्रकरणी शेखर काशीनाथ बोरकर (५०) संभाजी कसार रोड, मस्कासाथ यांच्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी अतुल ठाकरे याच्यावर ३८४, सहकलम ६६ ड माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
 
अतुल बारचा कर्मचारी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल ठवरे हा विशाल जयस्वाल यांच्या एका बियर बारमध्ये कामाला होता. जयस्वाल यांच्याकडून खंडणी उकळण्यासाठी विशालने वेगवेगळ्या नावाने सीम कार्ड खरेदी केले होते. मोबाईलमध्ये एकेक सीम टाकून तो जयस्वाल यांच्याशी संपर्क साधायचा. एकदा संपर्क साधल्यानंतर ते सीम तो तोडून फेकायचा. त्यामुळे पोलिसांना तपासाची दिशा समजून येत नव्हती. शेवटी तंत्रज्ञानाच्या मदतीने या प्रकरणाचा छडा लावला.