लग्नाच्या वरातीवर दगडफेक; एकाचा मृत्यू

    दिनांक :31-May-2019
मध्य प्रदेशच्या देवास जिल्ह्यातील सोनकच तालुक्यात एक विचित्र घटना घडली. साऊंड सिस्टिमवरुन झालेल्या वादातून लग्नाच्या वरातीवर दगडफेक करण्यात आली. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.  बुधवारी रात्री पिप्लियारावन भागात लग्नाची वरात निघाली होती. त्यावेळी वरातीमधील कानठळया बसवणाऱ्या संगीतावर काही जणांनी आक्षेप घेतला अशी माहिती पिप्लियारावन पोलिसांनी दिली.
 
 

 
आक्षेप घेणारे आणि वरातीत नाचणाऱ्यांमध्ये त्यावरुन वादावादी झाली. आक्षेप घेणाऱ्यांनी इमारतीच्या छतावरुन वरातीवर दगडफेक केली. त्यामध्ये अयोध्या बस्तीमध्ये रहाणारे धर्मेंद्र शिंदे यांचा मृत्यू झाला. वरातीमध्ये सहभागी झालेल्यांनी या हल्ल्याचा प्रत्युत्तर दिले. त्यावेळी या भागात जोरदार राडा झाला. दोन जण यामध्ये जखमी झाले.
हिंसाचार झालेल्या भागापासून पोलीस स्टेशनजवळच होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. पण परिस्थिती आणखींनच बिघडली. पोलिसांना अतिरिक्त कुमक मागवावी लागली. जिल्हाधिकाऱ्यांनी या भागात कलम १४४ लागू केले आहे. परिस्थिती आता नियंत्रणात आले.