भरउन्हाळ्यात नायब तहसीलदारांनी घर पाडून परिवाराला आणले रस्त्यावर

    दिनांक :31-May-2019
 मोहाडी: तालुक्यातील सिरसोली (कां) येथे आबादी प्लॉटवर बांधण्यात आलेले घर मोहाडीच्या नायब तहसीलदारांनी पाडून भरउन्हाळ्यात घरातील सदस्यांना रस्त्यावर आणले. त्यामुळे रुग्णालयात भरती होण्याची वेळ आल्याने तसेच जीवनोपयोगी वस्तू, धान्य, संपूर्ण कपडे घराच्या मलब्यात दबल्याने गावात तणाव निर्माण झाला आहे.
 
 
 
तालुक्यातील सिरसोली (कां) येथे आबादी भूखंडावर 2011-12 मध्ये अतिक्रमण करून शिवलाल बाबूराव लिल्हारे यांनी घर बांधले होते. या घराचा नमुना-8 सुद्धा ग्रामपंचायतीने तयार केलेला आहे. शिवलाल लिल्हारे 2012 पासून आजपर्यंत गृहकरही ग्रामपंचायतीमध्ये जमा करीत आहेत.
सिरसोली ग्रामपंचायतीअंतर्गत अनेक ठिकाणी अनेक जणांनी अतिक्रमण केलेले आहे. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीतील वादाचा वचपा काढण्यासाठी सरपंचाने माझ्यावर ही कारवाई केल्याचे शिवलाल यांचे म्हणणे आहे.
नायब तहसीलदारांनी अतिक्रमणाबाबतची दिलेली नोटीस बघून शिवलाल लिल्हारे यांना धक्काच बसला व प्रकृती खालावल्यामुळे त्यांना 30 मे रोजी सकाळीच मोहाडी ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. पूर्ण परिवार रुग्णालयात असताना तिकडे सिरसोली गावात कुटुंबाच्या अनुपस्थितीत लिल्हारे यांचे घर पाडण्यात आले व घरातील जीवनोपयोगी साहित्य मलब्यात दाबण्यात आले.
त्यामुळे हा संपूर्ण परिवार रस्त्यावर आला आहे. अंगावरील कपड्याशिवाय दुसरे काहीही लिल्हारेंजवळ नाही. निवारा नसल्याने राहावे कुठे, असा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.