ओबामांनी दिल्या मेस्सीला विश्वचषक जिंकण्याच्या टिप्स

    दिनांक :31-May-2019
बोगोटा (कोलंबिया),
 
अर्जेंटिनाचा विद्यमान काळातील दिग्गज फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी याला अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांनी फिफा विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद पटकाविण्यासंदर्भात काही टिप्स दिल्या असल्याची माहिती आहे. गेल्या स्पर्धेत अर्जेंटिनाला विश्वचषक जिंकण्यात यश आले नव्हते. या संघाला बाद फेरीतच विजेत्या फ्रान्स संघाकडून मात खावी लागली होती. ब्राझीलमध्ये 2014 साली झालेल्या विश्वचषक अंतिम सामन्यात मेस्सीच्या संघाला जर्मनीने पराभूत केले होते.
 
 
 
 
 
या पार्श्वभूमीवर बोलताना ओबामा म्हणाले की, अर्जेंटिनाचे 11 खेळाडू विश्वचषक जिंकू शकले नाही कारण ते एक संघ म्हणून खेळत नाही. ज्या लोकांना आपण हुशार समजतो तेच आपली शैली विकसित करण्यासाठी इतर लोकांची मदत घेत असतात. अर्जेंटिनामध्ये मेस्सी उत्कृष्ट आहे. मात्र, विश्वचषक जिंकण्यात संघ अपयशी ठरतो. फारच कमी लोक स्वत:च्या भरवशावर मोठ्या उपलब्धी प्राप्त करीत असतात, असा सल्लाही ओबामा यांनी युवा खेळाडूंना दिला. अर्जेंटिनाचा संघ पुढील महिन्यात ब्राझील येथे होणार्‍या कोपा अमेरिका स्पर्धेत सहभागी होणार आहे.