शपथविधीच्यावेळी अबुधाबीच्या टॉवरवर झळकले मोदी

    दिनांक :31-May-2019
अबुधाबी,
लोकसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सायंकाळी दुसर्‍यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. संयुक्त अरब अमिरातने यानिमित्ताने अबु धाबीतील एका तेल कंपनीच्या मुख्यालयाच्या इमारतीवर मोदींच्या छायाचित्रासह प्रिन्स आणि संयुक्त अरब अमिरातचे सुप्रीम कमांडरची छायाचित्रे झळकली.
 
 
 
अबुधाबी राष्ट्रीय तेल कंपन्यांची कार्पोरेट कार्यालये या इमारतीमध्ये आहेत. या इमारतीवर डिजिटल स्क्रीन लावण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वीच संयुक्त अरब अमिरातने मोदींना तेथील सर्वोच्च मानाचा झायेद पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. अमिरातचे अध्यक्ष शेख खलिफा बीन झायेद अल नाह्यान यांनी हा पुरस्कार दिला होता.
 
भारतासोबतच्या ऐतिहासिक मैत्री आणि धोरणांसाठी नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे मैत्रिपूर्ण संबंध उपयुक्त ठरतील. यामुळेच त्यांना झायेद पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे, असे अबुधाबीचे प्रिन्स मोहम्मद बीन झायेद यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे. मोदी यांचे छायाचित्र इमारतीवर झळकवितानाचा व्हिडीओ तेथील भारतीय दूतावासाने ट्विट केला आहे.