दिल्लीतील कॉंग्रेस मुख्यालयासमोर राफेलची प्रतिकृती

    दिनांक :31-May-2019
नवी दिल्ली,
राफेल लढाऊ विमानावरून सत्तारुढ भाजपा सरकावर हल्ला करणार्‍या तसेच या व्यवहारावरून लोकसभा निवडणूक प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सातत्याने चौकीदार चोर है असा टोमणा मारणार्‍या कॉंग्रेसच्या राजधानी दिल्लीतील मुख्याालयासमोरच आज राफेल विमानाची प्रतिकृती मोठ्या थाटात उभी आहे आणि जाणार्‍या येणार्‍यांचे लक्ष वेधून घेत आहे.
 
 
 
प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या कॉंग्रेस पक्षाने या राफेल विमानाच्या व्यवहारावरून प्रचारादरम्यान रान उठवले होते. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रत्येक सभेत नरेंद्र मोदी सरकारवर राफेलवरून टीका केली होती. त्यामुळे की काय राफेल विमान सर्वांनाच परिचित झाले.
दिल्लीतील 24, अकबर रोडवर कॉंग्रेस पक्षाचे मुख्यालय आहे. त्याच्या समोरच वायुसेना प्रमुख बी. एस. धनोआ यांचे निवासस्थान आहे. त्यांच्या निवासस्थानाबाहेरच राफेल विमानाची ही प्रतिकृती लावण्यात आली आहे. जणू काही ही प्रतिकृती कॉंग्रेस मुख्यालयाकडे पाहून वाकुल्या दाखवत आहे, असा भास होता. धनोआ यांच्या बंगल्याच्या समोरच कॉंग्रेस मुख्यालय असल्यामुळे ही प्रतिकृती कॉंग्रेस मुख्यालयासमोर लावली आहे की काय, असा भास होतो. राफेलची ही प्रतिकृती मात्र दिल्लीकरांसाठी आकर्षणाचे केंद्रिंबदू ठरली आहे. ही बाब प्रचार माध्यमांच्या लक्षात आल्याला, राफेलची ही प्रतिकृती प्रकाशझोतात आली.
काही दिवसांपूर्वीच धनोआ यांनी राफेल विमानांचे कौतुक केले होते. तसेच राफेलची उत्सुकता लागली असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्याची चर्चा चांगलीच रंगली होती. त्यात आता राफेल विमानाची प्रतिकृतीच धनोआ यांच्या घरासमोर लावण्यात आली आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये राफेल विमान भारतात दाखल होणार आहे. राफेल विमानांचा भारतीय वायुदलात समावेश झाल्यानंतर भारताची लष्करी क्षमता वाढून शत्रूंवर वचक ठेवता येईल, असा विश्वासही याआधी धनोआ यांनी व्यक्त केला आहे.