सुषमा स्वराजांनी मानले मोदींचे आभार

    दिनांक :31-May-2019
नवी दिल्ली,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसर्‍या सत्तापर्वाच्या कार्यकाळाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि 57 मंत्र्यांनी राष्ट्रपती भवनात मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. या नवीन मंत्रिमंडळात काहींना वगळण्यात आले तर काहींनी नव्याने संधी मिळाली. अरुण जेटली, सुषमा स्वराज हे ज्येष्ठ नेते प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे यंदाच्या मंत्रिमंडळात सहभागी झाले नाहीत. गुरुवारी शपथविधी झाल्यानंतर सुषमा स्वराज यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. सोबतच त्यांनी ट्विटवरून आपल्या नावापुढील परराष्ट्र मंत्री असा असलेला उल्लेखही हटविला आहे.
 
 
 
सुषमा स्वराज यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे की, पंतप्रधान मोदीजी, आपण मला पाच वर्षे परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून देशवासीयांची आणि परदेशातील भारतीयांची सेवा करण्याची संधी दिली. या पाच वर्षांच्या काळात मला वैयक्तिक पातळीवर खूप सन्मान दिला. मी त्याबद्दल आपली आभारी आहे. आपले सरकार यशस्वीरीत्या यापुढेही चालेल, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे.