सिद्धार्थ- मृण्मयीच्या 'मिस यू मिस्टर'चा टीझर लाँच

    दिनांक :31-May-2019
मुंबई:
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे ही ग्लॅमरस जोडी 'मिस यू मिस्टर' या आगामी मराठी चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांना भेटायला येणार असून या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाच्या टीझरमधील सिद्धार्थ आणि मृण्मयीच्या 'बोल्ड' आणि 'हटके' दृश्यांमुळे टीझरची चर्चा होतं आहे.
 
 
करिअरच्या संधीमुळे लग्नानंतर परदेशात गेलेला नवरा आणि भारतात असलेली बायको...त्यांचं 'लाँग डिस्टन्स रिलेशनशिप'....अंतरामुळे वाढलेला दुरावा आणि दुराव्यामुळं लागलेली प्रेमाची ओढ या सगळ्या भावनांचा पट आपल्याला या टीझरमध्ये पाहायला मिळतो. करिअरच्या निमित्तानं दूर राहणाऱ्या या जोडप्यांच्या नात्यात , कौटुंबिक बंधांत होत जाणारा बदल या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
समीर जोशी यांनी दिग्दर्शनाबरोबरच या चित्रपटाचे लेखनही केले आहे. मृण्मयी आणि सिद्धार्थसोबत राजन भिसे, सविता प्रभूणे, अविनाश नारकर, राधिका विद्यासागर हे कलाकारही चित्रपटात झळकणार आहेत. 'मिस यू मिस्टर' २८ जून २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.