वेस्ट इंडिज VS पाकिस्तान ; 'हे' आहे महत्त्वाचे खेळाडू

    दिनांक :31-May-2019
पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ म्हणजे अनपेक्षित कामगिरीसाठी ओळखले जातात. कोणत्याही क्षणी मातब्बर संघांना पराभवाचा धक्का देण्याची क्षमता बाळगून असलेले हे दोन्ही संघ विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्यात एकमेकांशी भिडणार आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये गेल्या १० सामन्यांत पराभूत झालेल्या पाकिस्तानसाठी दोन वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये जिंकलेला चॅम्पियन्स करंडक हेच एकमेव प्रेरणादायी आहे, तर यंदाची इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट गाजवणाऱ्या खेळाडूंचा विंडीज संघ पाकिस्तानला पहिलाच हादरा देण्यासाठी उत्सुक आहे.
 
 
 
वेगवेगळ्या लयीत असलेले दोन्ही संघ नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर पहिल्यावहिल्या विजयासाठी प्रयत्नशील आहेत. वेस्ट इंडिजमध्ये अनेक स्फोटक फलंदाज असून त्यांचे चौकार आणि षटकार पाहण्याची उत्सुकता प्रत्येकाला आहे. पाकिस्तान संघामध्ये अनेक वेगवान गोलंदाज असून आज त्याच्या प्रदर्शनाकडे संपूर्ण जगाचे लक्ष राहणार आहे. दोन्ही संघामध्ये काही असे खेळाडू आहे, जे संपूर्ण सामना पालटवू शकतात. 
मोहम्मद आमिर
निकालनिश्चिती प्रकरणामुळे बंदीची शिक्षा भोगलेल्या मोहम्मद आमिरने पाकिस्तान संघात पुनरागमन केले आहे. त्यामुळे गोलंदाजीत पाकिस्तानचा संघ आमिरच्या कामगिरीवर अवलंबून आहे. मात्र चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात तीन बळी मिळवत आमिरने पाकिस्तानला विजेतेपद मिळवून दिले होते. मात्र त्यानंतर आमिरला १५ सामन्यांत फक्त पाच बळी मिळवता आले आहेत.
 
शहदब खान आणि वहाब रियाज 
 
वॉर्म अप मॅचमध्ये अफगाणिस्तानच्या विरोधात वहाब रियाजने अचूक गोलंदाजी केली होती. पाकिस्तानचा संघ  वहाब रियाजच्या गोलंदाजीवर अवलंबून आहे. लेग-स्पिनर शाहदब खान सुद्धा वेस्ट इंडिजसाठी घातक ठरू शकतो.    
शाय होप 
सराव सामन्यात ख्रिस गेलचा झंझावात पाहायला मिळाला नसला तरी शाय होपने मात्र खणखणीत शतक झळकावत आपणही आक्रमक लयीत असल्याचे दाखवून दिले. इतकेच नव्हे तर गेल्या पाच सामन्यांत त्याने दोन शतके आणि दोन अर्धशतके झळकावत विंडीजच्या विजयात योगदान दिले आहे. एविन लुइस, आंद्रे रसेल आणि जेसन होल्डर यांनी सराव सामन्यात चांगली फलंदाजी केल्यामुळे वेस्ट इंडिजची फलंदाजी तगडी वाटत आहे.
 
आंद्रे रस्स्ल 
 
नाईट राईडर्सकडून खेळणारा आंद्रे रस्स्ल त्याच्या स्फोटक खेळासाठी ओळखला जातो. आयपीएलमध्ये त्याने केलेल्या खेळी आज सुद्धा क्रिकेट प्रेमींच्या लक्षात आहे. वहाब रियाज आणि शाहदब खान सारख्या गोलंदाजाला रस्स्ल कसे उत्तर देणार या कडे सगळ्यांचे लक्ष आहे.  
विंडीजला गोलंदाजीची चिंता
रसेल आणि ब्रेथवेट या दोन्ही अष्टपैलू खेळाडूंना अंतिम संघात स्थान देण्यात आले तर वेस्ट इंडिजसमोर गोलंदाजीत मोजकेच पर्याय उपलब्ध असतील. केमार रोच आणि श्ॉनन गॅब्रियन यांच्यावर वेगवान गोलंदाजाची धुरा सोपवली आणि फिरकीपटू अ‍ॅशले नर्सला संधी दिली तर वेगवान गोलंदाज ओशाने थॉमस याला संघाबाहेर बसावे लागेल. त्यामुळे फलंदाजीतील ताकद वाढवायची की एखाद्या विशेषज्ञ गोलंदाजाला संधी द्यायची, हा पेचप्रसंग संघ व्यवस्थापनाला सोडवावा लागेल.