बांगलादेशातही 'फनी'चे थैमान, 14 बळी
   दिनांक :04-May-2019
ढाका,
फनी चक्रीवादळाने आज शनिवारी बांगलादेशात प्रचंड थैमान घातले असून, मुसळधार पाऊस आणि वादळी वार्‍यांनी आतापर्यंत 14 जणांचे बळी घेतले, तर 63 जण जखमी झाले आहेत. या चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे 16 लोक प्रभावित झाले आहेत. या सर्व लोकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय देण्यात आला आहे. वादळासोबत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराने 36 गावांना विळखा घातला आहे. बांगलादेशच्या किनारपट्टी भागांमध्ये प्रचंड नुकसान झाले असल्याचे वृत्त ढाका ट्रिब्युन या दैनिकाने दिले आहे.
 
 
 
किनारपट्टीच्या भागातील आठ जिल्ह्यांना चक्रीवादळाचा फार जास्त फटका बसला आहे. ठार झालेल्यांमध्ये चार महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. अनेक घरांची पडझड झाली असून, मोठमोठी वृक्षे आणि विजेचे खांबही कोसळले आहेत. यामुळे या आठही जिल्ह्यांमधील वीज पुरवठा खंडित झाला आहे. विमान सेवाही प्रभावित झाली आहे.
ओडिशातील बळीसंख्या 12
फनी चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे ओडिशात ठार झालेल्यांची संख्या 12 च्या घरात गेली असून, पाण्याखाली आलेल्या सुमारे दहा हजार गावांमध्ये एनडीआरएफ आणि निमलष्करी दलांच्या जवानांनी युद्धपातळीवर मदत व बचाव कार्य हाती घेतले आहे. शहरी भागांमध्येही झालेले नुकसान फार जास्त आहे. दोनशेपेक्षा जास्त नागरिक जखमी झाले असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार केले जात आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी दिली.