बुरखाबंदी की घुंघटबंदी?
   दिनांक :04-May-2019
श्रीलंकेत मुस्लिम महिलांनी बुरखा घालण्यावर बंदी आल्यानंतर शिवसेनेने आपल्या सामना मुखपत्रातून, भारतातही सुरक्षेच्या कारणास्तव बुरख्यावर बंदी घालण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. सामनाच्या संपादकांचे म्हणणे किती गांभीर्याने घ्यायचे, हे पंतप्रधान ठरवतील. परंतु, या प्रकरणात वामपंथी विचारांचे कट्‌टर समर्थक, प्रसिद्ध गीतकार व स्वत:ला जाहीरपणे नास्तिक म्हणवून घेणारे जावेद अख्तर यांनी का पडावे कळत नाही. शिवसेनेच्या बुरखाबंदीच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना जावेद म्हणाले की, मी भारतात बुरखाबंदी लागू करण्याचे समर्थन करीन. पण सोबतच, हिंदू महिलांमधील घुंघटप्रथाही बंद करण्यात आली पाहिजे. बुरखा न घालणे जसे मुसलमान समाजात सार्वत्रिक नाही, तसेच घुंघट घेणे हे हिंदू समाजात सार्वत्रिक नाही. पण, तरीही जावेदसाहेबांनी बुरखा आणि घुंघट यांची तुलना करूनच टाकली. तसे पाहिले, तर जावेद अख्तर यांना या प्रकरणात पडायलाच नको. मुसलमान समाजात त्यांना काहीही स्थान नाही. त्यांचे कुणी ऐकत नाही. असे असताना, शिवसेनेच्या बुरखाबंदीच्या मागणीविरोधात जावेदसाहेबांनी कशाला प्रतिक्रिया द्यावी? हिंदू समाजाला डिवचण्याची अनायासे एक संधी मिळत आहे म्हणून?
 
 
 
इतिहास पाहिला तर असे लक्षात येईल की, घुंघट घेण्याची प्रथा पूर्वी भारतात नव्हती. भारतीय समाज अतिशय मुक्त वातावरणात जगणारा होता. मुसलमानांच्या टोळधाडी आल्यात आणि हिंदू स्त्रियांचे पावित्र्य व सुरक्षा धोक्यात आली. त्यामुळेच आपला चेहरा दिसू नये, यासाठी घुंघट ही प्रथा हळूहळू समाजात बळावली, असे इतिहासतज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळेच की काय, ज्या उत्तर भारताने मुसलमान आक्रमकांचे सर्वाधिक अमानुष अत्याचार सहन केले, त्या भागातच तुम्हाला घुंघटप्रथा दिसून येईल. दक्षिण भारतात तर याचा मागमूसही दिसणार नाही. घुंघट घेणे हा जर हिंदू समाजातील प्रथेचा एक भाग असता, तर तो उत्तर भारताप्रमाणेच दक्षिण भारतातही दिसायला हवा होता. पण असे दिसून येत नाही. जावेदसाहेब या इतिहासाची नोंद घेतील, अशी आशा आहे. दुसरे म्हणजे, श्रीलंकेत जी बुरखाबंदी घोषित करण्यात आली, ती मुस्लिम महिलांना मोकळा श्वास घेता यावा म्हणून नाही. काही दिवसांपूर्वी लंकेत जे आत्मघाती बॉम्बस्फोट झालेत आणि त्यात सुमारे 350 जण मरण पावले व हजारो जखमी झालेत, त्या पृष्ठभूमीवर ही बुरखाबंदी जाहीर करण्यात आली आहे. बुरखाप्रथेचा आधार घेऊन मुसलमान दहशतवादी सुरक्षा यंत्रणेला चकमा देऊन पुन्हा दहशतवादी कारवाया करू शकतात, या भीतिपोटी ही बुरखाबंदी घालण्यात आली आहे. जावेदसाहेबांच्या तीक्ष्ण बुद्धीतून ही वस्तुस्थिती सुटलेली दिसते. घुंघट घातलेल्या किती हिंदू महिलांनी हिंसाचार माजवलेला आहे, याची माहिती जावेदसाहेबांनी द्यावी. तसाही हिंदूना दहशवादी ठरविण्याचा काही नतद्रष्ट भारतीयांचा कट असफल ठरलाच आहे. येनकेनप्रकारेणदेखील हिंदूना दहशतवादी ठरवता येत नाही, इतका हा समाज सहिष्णू आणि शांतिप्रिय आहे. असे असताना, विनाकारणच काही प्रांतातील हिंदूंमध्ये असलेल्या (व आता झपाट्याने नष्ट होत असलेल्या) घुंघटप्रथेला वादात ओढणे, जावेदसाहेबांना शोभले नाही.
 
तसेही जावेदसाहेबांचे राष्ट्रवादी शक्तींशी कधी जमलेच नाही. ते हिंदूंना शिव्या देत असल्यामुळे असेल किंवा स्वत: नास्तिक असल्यामुळे असेल, त्यांना सेक्युलर जमातीत फार मानाचे स्थान मिळाले आहे. आपण चित्रपटांसाठी गीते लिहिलीत याचा अर्थ आपल्यामागे प्रचंड संख्येत लोक आहेत, असे कुणीही कृपया समजू नये. हिंदूंचा द्वेष, त्यांच्या प्रथा-परंपरांना बिनडोकासारखा विरोध करणारे जावेदसाहेब, वैचारिक जवळीक म्हणून बेगुसराय येथे निवडणूक प्रचारालाही जाऊन आले आहेत. या लोकसभा मतदारसंघातून ‘तुकडे तुकडे गँग’चा म्होरक्या कन्हैयाकुमार भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढत आहे. त्याच्या प्रचारार्थ जावेदसाहेब गेले होते. कुठल्या संबंधाने जावेद साहेब तिथे गेले होते? असे कुठले गुण त्यांना कन्हैयाकुमारात दिसले की, अशी गुणसंपन्न व्यक्ती संसदेत पोहोचली नाही तर भारतीय लोकशाहीची अपूर्त हानी झाली असती? भारताचे तुकडे करण्याची मनीषा ठेवणारे हे लोक आहेत, हे जावेदसाहेबांना माहीत नव्हते काय? संसदेवर दहशतवादी हल्ला करणार्‍या अफजल गुरूला फाशी देणारे भारत सरकार अजून अस्तित्वात आहे म्हणून स्वत: शरिंमदा होणारे हे लोक आहेत, हे जावेदसाहेबांपासून लपून होते काय? संसदेवर हल्ला करणारा अफजल गुरू ज्यांचा आदर्श, त्यांनाच संसदेत पाठविण्यामागे जावेदसाहेबांचा इतका आटापिटा कशापायी? आपल्या सुंदर, सुंदर गीतांनी भारतीय मानस भुरळले आहे, त्यामुळे आपण म्हणू तसे सर्व वागतील, असे जावेदसाहेबांना वाटत असेल तर तो भ्रम आहे, हे लक्षात ठेवावे. हा नवा भारत आहे. स्वत:ला नास्तिक म्हणवून घेत, केवळ हिंदूंच्या प्रथा-परंपरांवर विखारी वैचारिक हल्ला चढविणे, आता कुठलाच हिंदूं सहन करणार नाही. आज जावेदसाहेबांना साध्वी प्रज्ञािंसहची उमेदवारी डोळ्यांत सलत आहे. ती तर एका राजकीय षडयंत्राची शिकार आहे. परंतु, आतापर्यंत उत्तरप्रदेश, बिहारमध्ये खुनी, अपहरणकर्ते असलेले मुसलमान उमेदवार उभे राहून जिंकून येत होते, तेव्हा याच जावेदसाहेबांची दातखिळी बसली असायची. तेव्हा नाही जावेदसाहेबांनी भारतीय लोकशाहीची चिंता केली. आता जेव्हा संपूर्ण भारत राष्ट्रवादाच्या ज्वलंत भावनेने पेटून उठत आहे, तेव्हा मात्र या मंडळींना भारतीय लोकशाहीची चिंता सतावू लागली आहे.
 
ज्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत मसूद अझहरचा समावेश करण्यात आला, ती संपूर्ण यादी जावेदसाहेबांनी एकदा नीट वाचून काढावी. त्यात सर्व नावे मुसलमानच कशी काय आहेत? की तिथेही मोदींनी हेराफेरी केली?
खरेतर, आम्ही भारतीयच मूर्ख आहोत. प्रतिभावान साहित्यकार म्हणून आम्हीच या असल्या विषारी सापांना अस्तनीत वागवत आलो आहोत. पुराणात ज्याप्रमाणे, विविध मोहक रूप घेऊन येणारे राक्षस, मरण येताच आपल्या विकराल स्वरूपात मृत्युमुखी पडायचे, तद्वतच हे सर्व प्रतिभावान विद्वान, गेली पाच वर्षे मलिदा मिळाला नाही म्हणून आपल्या खर्‍या हिडिस स्वरूपात समोर येऊ लागले आहेत. महत्प्रयासांनी लपवून ठेवलेले चेहरे सर्वसामान्य लोकांसमोर उघडे होऊ लागले आहेत. खरा घुंघट तर यांच्याच चेहर्‍यांवरून काढायला हवा होता, जो केवळ पाच वर्षे मोदींनी राज्य केले तर गळून पडत आहे. यांना मुसलमान समाजाचे काहीएक घेणे नाही. मुसलमान समाजाला प्रगतिशील, विज्ञानवादी बनविण्यात यांना ना कुठला रस, ना यांच्याकडे योजना आहे. फक्त भारतात कुठे मुसलमानाविरुद्ध जरा काही खुट्‌ट झाले की, हे लगेच हिंदूंवर तुटून पडणार. त्यांचा मानभंग करणार. तेजोभंग करणार. याचेच मग त्यांना शासकीय पारिश्रमिकही मिळणार. आयुष्यभर चित्रपटांच्या पटकथेत त्यांनी हेच तर विष बेमालूम मिसळून विकले. पण यांचे दुर्दैव इतके की, ते विष पचवूनही हा िंहदू समाज एखाद्या अमर नायकाप्रमाणे शक्तिसंपन्न होऊन यांनाच आव्हान देत उभा ठाकला आहे. यांचेच बुरखे टरटरा फाडत आहे. हे सर्व भारतीय लोकशाहीला आवश्यक असेच आहे. जावेदसाहेब, घुंघटबंदी, बुरखाबंदीचे नंतर पाहू. आधी तुमच्यासारख्यांचे बुरखे फाडणे तर पूर्ण होऊ द्या!