नक्षल्यांशी चर्चेतून मार्ग काढावा, मध्यस्थीसाठी तयार

    दिनांक :04-May-2019
अण्णा हजारे यांनी दर्शवली तयारी
 
नगर: नक्षली महाराष्ट्रात जन्मले, महाराष्ट्रातच राहतात. नक्षलवादाचा प्रश्न बंदुकीने संपणारा नसून सरकारने चर्चेतून मार्ग काढावा. मी मध्यस्थीसाठी तयार आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. गडचिरोलीत महाराष्ट्र दिनीच नक्षल्यांच्या हल्ल्यात 15 पोलिस जवान शहीद झाले. त्यावर अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली.
 

 
 
नक्षलसंबंधी प्रश्न बंदुकीने सुटणार नाही. यासाठी सरकारने त्यांच्याशीच चर्चा करून मार्ग काढला पाहिजे. नक्षल्यांशी बोलणी करण्यास सरकार पहिले पाऊल टाकत असेल तर आपण मध्यस्थी करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होऊ. मानवतेच्या धर्माने आपण हे कार्य पार पाडू, असे अण्णा हजारेंनी म्हटले आहे. अशाप्रकारच्या हल्ल्याने, बंदुकीने, गोळीबाराने प्रश्न सुटणारे नाहीत. नक्षलवादी परके नाहीत. तर, त्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद जवानही आपलेच आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंनी चर्चा व्हावी. सलोख्याने हा प्रश्न सुटेल असा आपणास विश्वास आहे, असेही अण्णांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गडचिरोलीमधील जांभूळखेडा येथे 1 मे रोजी नक्षल्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात 15 पोलिस जवान शहीद झाले. याप्रकरणी कंपनी चार टिपागड आणि कोरची दलमच्या नक्षल्यांविरोधात पुराडा ठाण्यात हत्या आणि देशद्रोहासह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.