श्री रघुनाथ महाराज पत्तरकिने
   दिनांक :04-May-2019
विदर्भातील संत
डॉ. राजेंद्र डोळके
9422146214
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा अव्याहत संचार विदर्भात सुरू झाल्यापासून, त्यांच्या अलौकिक विभूतिमत्त्वाने सहस्रावधी भाविक तरुण अक्षरश: त्यांच्या भजनी लागले. रघुनाथजीसारखा आदर्शजीवी तरुण त्यांच्याकडे आकर्षित झाला नसता तरच नवल. महाराजांच्या संपर्कात आल्यापासून ते त्यांच्या गुरुदेव सेवा मंडळाचे उत्साही कार्यकर्ते झाले. 1942 च्या आंदोलनात महाराजांनी भाग घेतला होता. त्यांच्याबरोबर विदर्भातील इतर असंख्य उत्साही कार्यकर्त्यांबरोबर रघुनाथरावांनीही भाग घेतला होता. त्यानंतर महाराजांनी विश्वशांती नामसप्ताहाची आयोजने गावोगाव केली. त्याचे प्रमख सूत्रधार रघुनाथजीच होते. नागपूरच्या गुरुदेव सेवामंडळाचे प्रमुख संशोधक व ‘गुरुदेव’ मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी जे कुशलतापूर्वक कार्य केले, त्याचे कौतुक स्वत: महाराज करीत असत. सेवा मंडळाच्या कार्यातील विविध दायित्व नीट पार पाडता यावे, यासाठी आपल्या पारिवारिक जीवनाचा एकमेव आधार असलेली शाळेतील शिक्षकाची नोकरीसुद्धा त्यांनी सोडून दिली. 1938 साली महाराजांनी रघुनाथजींना विचारले, ‘‘तुला ब्रह्मचारी राहून माझ्याजवळ राहायचे आहे की गृहस्थाश्रमी?’’ त्यावर रघुनाथांनी ‘गृहस्थाश्रमी व्हायचे आहे,’ असे उत्तर दिले. लवकरच रघुनाथजींचे लग्न महाराजांच्या इच्छने नागपुरातील सुविख्यात वाईकर घराण्यातील भाऊसाहेब वाईकर यांच्या कन्या विमल यांच्याशी झाले.
 
गुरूंनी दिलेल्या आदेशानुसार त्यांच्या विचारांचा व आध्यात्मिक साधनेचा प्रचार करण्याकरिता रघुनाथजींचे भारतभ्रमण सुरू होते. 1940 साली महाराजांनी त्यांना संघात जाण्याची आज्ञा केली. रघुनाथजींनाही संघकार्याची ओढ होतीच. संघातील अनेक कार्यकर्ते त्यांचे परममित्र होते. संघाच्या अनेक कार्यांत ते क्रियाशील झाले. मा. बाळासाहेब देवरस यांनी त्यांना मंगळवारी शाखेचे कार्यवाह केले. एका वर्षाच्या आतच ते प्रचारक म्हणून श्री गोळवलकर गुरुजींच्या आज्ञेने बिहार प्रांतात प्रचारासाठी गेले. ग्वाल्हेर येथे झालेल्या शिबिरात प्रथमच त्यांचा आणि पं. दीनदयाल उपाध्याय यांचा संबंध आला. तो उत्तरोत्तर दृढ होत गेला.
 
रघुनाथजींच्या त्यागी, नि:स्वार्थ, धर्मप्रवण आणि अध्यात्मनिष्ठ कार्यामुळे त्यांची गणना ‘संत’मंडळींत होऊ लागली. एक सत्पुरुष म्हणून त्यांना मान्यता मिळाली. त्यांच्या संतत्वाबरोबर त्यांच्यातील कवित्व हाही एक अत्यंत महत्त्वाचा पैलू लक्षात घेतला पाहिजे. त्यांच्या नावावर 10-12 ग्रंथ आहेत. या सर्वच ग्रंथांतून त्यांच्या उच्च दर्जाच्या काव्यप्रतिभेचा आणि भक्तिरसाचा आढळ होतो. संत तुकडोजी महाराजांवरील लिहिलेला त्यांचा ‘चरित्रामृत ग्रंथ’ हा फार प्रसिद्ध आहे. त्यांचे इंग्रजी भाषेवरही प्रभुत्व होते. ‘डिव्हाईन डॉन’ नावाचे एक अप्रतिम भक्तिकाव्य त्यांनी इंग्रजीतून लिहिले आहे. या काव्याचे मराठीतही भाषांतर झाले आहे. हे काव्य त्यांना उत्स्फूर्त सुचले असून ईश्वररूपाशी तादाम्य झाल्याची दिव्य पहाट त्यांच्या जीवनात उगवली, असा त्यातील गर्भितार्थ आहे. त्यांनी लिहिलेल्या अनेक काव्यरचनांपैकी काही रचना एकत्रित करून त्यांची पुस्तके प्रेमधारा परिवाराने प्रकाशित केली आहेत.
 
इ. स. 2003 च्या हनुमानजयंतीच्या दिवशी महाराजांचे निधन झाले. त्यांनी ‘प्रेमधारा परिवार’ स्थापन करून विविध ठिकाणी सत्संग व भजने चालू केली होती. आज या परिवाराचे विस्तीर्ण रूप होऊन महाराजांची परंपरा त्यातील अनेक भाविक अधिक उत्साहाने पुढे चालवीत आहेत.