का लावायचा टिळा?
   दिनांक :04-May-2019
हिंदू धर्मात कपाळावर टिळा लावण्याला मोठं महत्त्व आहे. शीर, मस्तक, गळा, हृदय, दोन्ही दंड, नाभी, पाठ, काखा अशा शरीरावर एकूण बारा ठिकाणी टिळा लावण्याची प्रथा आहे. टिळा लावणं लाभदायी मानलं जातं. प्रत्येक वारानुसार टिळा लावल्याने बरेच लाभ होऊ शकतात. टिळा लावण्याच्या प्रथेबद्दलची ही सविस्तर माहिती...
 
 
 
कपाळाच्या मध्यभागाला ललाटिंबदू असं म्हटलं जातं. भुवयांच्या मधोमध हा ललाटिंबदू असतो. शेंदूर किंवा कुंकुम उष्ण मानलं असल्याने या स्थानी टिळा लावणं आरोग्यकारक मानलं जातं. पूजा करताना देवाला कुंकू किंवा टिळा लावणं महत्त्वाचं आहे. देवाला आंघोळ घातल्यानंतर चंदनाला टिळा लावावा. पूजा करणार्‍यानेही मस्तकावर चंदनाचा टिळा लावला पाहिजे. यामुळे मन आणि शरीर शांत होतं. टिळा लावण्याआधी काही नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. स्नान करून, रेशमी वस्त्र धारण करून उत्तर दिशेला तोंड करून मगच टिळा लावला पाहिजे. चंदनाचा टिळा शितलता देतो. अनेकदा आपण रागाच्या भरात किंवा घाईघाईत कामं उरकतो, निर्णय घेतो. उत्साहाच्या भरात आपले निर्णय चुकतात पण चंदनाचा टिळा लावल्याने उत्तेजना नियंत्रणात राहते.
 
कोणत्या कार्यप्रसंगी कोणत्या बोटाने टिळा लावायला हवा याचा उल्लेख विष्णू संहितेत आढळतो. शुभ आणि वैदिक कार्य करताना अनामिकेचा वापर केला पाहिजे. श्राद्धकर्म आणि पितरांशी संबंधित कार्य करताना मधलं बोट, ऋषीकार्यात करंगळी तर तांत्रिक कार्यात पहिल्या बोटाचा वापर करून टिळा लावायला हवा. यामुळे योग्य तो परिणाम साधला जातो. अनामिकेने लावलेल्या टिळ्यामुळे शांततेचा लाभ होतो. मधल्या बोटाने टिळा लावल्यावर दीर्घायुष्याचा लाभ होतो. यासोबतच अंगठ्याने टिळा लावल्याने बळ, शारीरिक क्षमता वाढते, असं मानलं जातं.
 
कुमकुम, केशर, चंदन आणि भस्म अशा चार प्रकारांनी टिळा लावता येतो. कुंकवामुळे आपल्या आज्ञाचक्राची शुद्धी होते तसंच ज्ञानचक्र प्रज्वलित होतं. शांत, थंड मेंदूला केशराच्या टिळ्याने उर्जीतावस्था प्राप्त होऊ शकते. चंदनामुळे मेंदू आणि मनाला शांतता लाभते. भस्मामुळे मनात वैराग्यभावना जागृत होते. भस्मामुळे विषाणूंचा नायनाट होतो. टिळा लावल्याशिवाय संध्या केली तर योग्य तो परिणाम साधला जात नाही. चंदनाच्या टिळ्यामुळे पापांचा नाश होतो. संकटं दूर राहतात. अशा व्यक्तीवर लक्ष्मीची कृपा राहते. प्रत्येक वारानुसार टिळा लावल्याने आपल्यावर ग्रहांची कृपा राहते. सोमवार हा शंकराचा वार मानला जातो. या दिवसाचा स्वामी म्हणजे चंद्र. चंद्र मनाचा कारक मानला जातो.
 
मनाला नियंत्रणात ठेऊन मेंदूला शांत ठेवण्यासाठी या दिवशी चंदनाचा टिळा लावा. विभूती किंवा भस्मही लावता येईल. मंगळवार हा मंगळाचा वार आहे. या दिवशी हनुमान आणि गणपतीची पूजा केली जाते. मंगळ लाल रंगाचं प्रतिनिधित्त्व करतो. त्यामुळे रक्तचंदन किंवा चमेलीचं तेल मिसळलेलं कुंकू या दिवशी लावता येईल. बुधवारी कोरडं कुंकू लावता येईल. गुरूला पांढरा आणि पिवळट रंग आवडतो. त्यामुळे गुरूवारी पांढरं चंदन उगाळून त्यात केशर मिसळून मस्तकावर टिळा धारण करावा. शुक्रवारी रक्तचंदनाचा टिळा लावल्याने ताण दूर होतो. तसंच भौतिक सुख-सुविधांची प्राप्ती होते. शनिवारी विभूती, भस्म किंवा रक्तचंदन लावलं पाहिजे. रविवारी रक्तचंदन किंवा हिरवं चंदन लावावं. यामुळे आपल्यावर भगवान विष्णूची कृपा राहते.