मॉंगे मिले न भीख!
   दिनांक :04-May-2019
कहत कबीरा    
डॉ. शैलजा रानडे
9420370840
 
देव आणि दानवांनी अमृतप्राप्तीसाठी समुद्रमंथन केले, तेव्हा समुद्रातून दिव्य रत्ने बाहेर पडू लागली. उच्चैश्रवा घोडा, कामधेनू गाय, ऐरावत हत्ती, पारिजातक वृक्ष... अशी विविध रत्ने पाहून देव आणि दानव हरखून गेले व आपापसात त्यांची वाटणी करू लागले. आणि जेव्हा समुद्रतनया लक्ष्मी प्रकट झाली, तेव्हातर प्रत्येकाच्या मनातच तिच्या प्राप्तीची इच्छा उत्पन्न झाली. तिने आपला स्वीकार करावा म्हणून सर्व देव-दानव तिच्या पुढे उभे राहिले. फक्त भगवान विष्णू तिच्यापुढे आले नाहीत आणि भगवती लक्ष्मीने सर्व देवांना सोडून भगवान विष्णूच्या गळ्यात वरमाला घातली. म्हणूनच म्हणतात- ‘न मागे तयाची रमा होय दासी!’ कबीरदास आपल्याला हेच सांगतात-
 
भगवान के दरबार में बडी है उलटी रीत।
अनमागत मोती मिले, मॉंगे मिले न भीख।।
भगवंताच्या घरचा हा खरोखरच उलटा न्याय आहे. न मागणार्‍याला भरपूर पैसाअडका मिळतो आणि मागणार्‍याला भीकसुद्धा मिळत नाही. दारावर आलेल्या भिकार्‍याला नेहमी पुढच्या घराची वाट दाखविली जाते. लहानपणी एक खेळ खेळला जायचा. ज्याच्यावर राज्य असेल त्या भिडूने इतर खेळाडूंपुढे हात करून ‘आई मला पुरी’ असे म्हणायचे आणि त्या खेळाडूने त्याच्या हातावर चापट मारून ‘जा त्या घरी’ असे म्हणून पुढच्या खेळाडूकडे पाठवायचे. तसेच मागणार्‍याचे होते. सगळे टोलवाटोलवी करतात. म्हणून भीक मागू नका. संत तुकारामसुद्धा म्हणतात-
भिक्षापात्र अवलंबिणे,
जळो जिणे लाजिरवाणे।
तेव्हा भीक मागून पोट भरण्यापेक्षा उद्योग, मेहनत करा. कारण-
‘उद्योगाचे घरी ऋद्धिसिद्धी पाणी भरी!’
परमेश्वराच्या दरबारात न मागता मिळणारे हे मोतीसुद्धा किती मौल्यवान आणि विविध प्रकारचे. हे मोती केवळ भौतिक धनाच्या पारड्यात मोजले जाणारे नाहीत; तर विद्याधन, कीर्तिधन, सद्गुणधन, सुपुत्रधन, आरोग्यधन... अशी या धनाची विविधता. परमेश्वराची ज्याच्यावर कृपा होते त्याला हे धन न मागता मिळते. कुणालाही हेवा वाटेल आणि दृष्ट लागेल असे हे धन. त्याचे मोल थोडीच करता येते! पण, ते मिळण्यासाठी मीराबाईसारखा भाव मनात हवा आणि मग ‘पायोजी मैने रामरतन धन पायो।’ असा अनुभव आला की, कबीराच्या म्हणण्याचा अर्थ लक्षात आला की, रामरतन धनाच्या मागेच, न मागता अगणित मोती येतात, जे जीवनाला संपन्न करतात...