आफ्रिदीची मानसिक स्थिती ठीक नाही, गंभीरचा पलटवार
   दिनांक :04-May-2019
नवी दिल्ली,
 
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीने त्याच्या 'गेम चेंजर' या आत्मचरित्रातून भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याच्यावर टीका केली होती. गंभीरचे कर्तृत्व काहीच नाही, परंतु त्याचा तोरा फार मोठा असतो, असे दावा आफ्रिदीने त्याच्या आत्मचरित्रात केला आहे. त्याला शनिवारी गंभीरने सडेतोड उत्तर दिले. आफ्रिदीची मानसिक स्थिती ठीक नसल्याचा अप्रत्यक्षित टोला गंभीरने लगावला. आफ्रिदी आणि गंभीर यांच्यात अनेकदा मैदानावरही शाब्दीक चकमक झालेली पाहायला मिळाली आहे. आता इतक्या वर्षांनंतरही या दोन खेळाडूंमध्ये मैदानाबाहेरही वाद सुरूच आहे.
 

 
शाहिद आफ्रिदीने आपल्या आत्मचरित्रामध्ये  लिहिले की,''कर्तृत्व काही नसताना गंभीर तोरा मिरवत होता. प्रतिस्पर्धी आक्रमक असला तरी चालेल, परंतु तो सकारात्मक असावा, गंभीरकडे सकारात्मकता नाहीच.''
 
 
आफ्रिदीच्या या वक्तव्यावर गंभीरने पलटवार केला आहे. त्याने आफ्रिदीला मानसोपचारतज्ज्ञाकडे जाण्याचा सल्ला दिला आहे. तो म्हणाला,''शाहिद आफ्रिदी काहीही बरळतोय. असो, आम्ही पाकिस्तानींना वैद्यकीय विझा देतोय. आफ्रिदीलाही तो मिळेल आणि त्याला चांगल्या मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जाण्याची जबाबदारी मी घेतो. तुला चांगली वैद्यकीय सेवा मिळवून देईन.''