उन्हामुळे इमारतीवरच्या जनरेटने घेतला पेट
   दिनांक :04-May-2019
तीव्र तापमानामुळे घडली घटना
अमरावती: शहरातल्या अत्यंत गजबजलेल्या भाजीबाजार परिसरातल्या एका रहिवाशी इमारतीवर लावण्यात आलेल्या मोबाईल टॉवरच्या जनरेटरला तीव्र तापमानामुळे शनिवारी दुपारी ४ वाजत भीषण आग लागली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

राजेश गोयनका यांच्या मालकीच्या इमारतीवर हे मोबाईल टॉवर आहे. टॉवरचे कार्य सुरळीत चालावे म्हणून जनरेटरही इमारतीवरच लावण्यात आले आहे. गेल्या आठ दिवसापासून तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. त्याचा परिणाम झाल्यानेच आज अचानकच जनरेटरने पेट घेतला. आजूबाजूच्या नागरिकांना हे लक्षात आल्यावर त्यांनी आरडाओरडा सुरू केली. मनपा अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. पथक घटनास्थळी पोहचेपर्यंत आगीने विक्राळ रूप धारण केले होते. अग्निशमनाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून ही आग दीड तासात नियंत्रणात आणली. यावेळी परिसरात मोठी गर्दी गोळा झाली होती. भाजीबाजर परिसर अत्यंत गजबजलेला आहे. येथे अगदी घरालाघर लागून आहे. आग लवकर नियंत्रणात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.