भारतविरोधी दहशतवाद्यांना पाकिस्तानचेच पाठबळ
   दिनांक :04-May-2019
- अमेरिकन संरक्षण खात्यातील तज्ज्ञांचा दावा
 
वॉशिग्टन,
भारतविरोधी दहशतवादी कारवाया करणार्‍या गटांना पाकिस्तानने नेहमीच पाठबळ दिले आहे. भारतासोबत मैत्री आणि शांततेच्या गप्पा करून, या देशाचा विश्वासघात करण्याची कोणतीही िंकमत पाकिस्तानला आजवर चुकवावी लागली नाही, असा दावा अमेरिकन संरक्षण खात्यातील तज्ज्ञांनी केला आहे.
 
 
 
सिनेट सभागृहापुढे याबाबतची माहिती देताना फाऊंडेशन फॉर डिफेन्स ऑफ डेमॉकॅ्रटिक्सचे वरिष्ठ सदस्य बिल रॉगी म्हणाले की, पाकिस्तान अजूनही त्यांच्या भूमीतील अतिरेकी गटांना भारतविरोधी कारवायांसाठी प्रोत्साहन देत आहे. अमेरिकेने नेहमीच दहशतवादविरोधी लढा तीव्र करायला हवा आणि पाकिस्तानसारख्या देशांबाबत अतिशय कठोर निर्णय घ्यायला हवेत.
 
पाकिस्तानकडून तालिबान्यांना मिळणार्‍या उघड पािंठब्याचा उल्लेख करताना रॉगी यांनी, अफगाणिस्तानातून आपल्या फौजा माघारी घेण्याच्या निर्णयावरही टीका केली. पाकिस्तानकडून तालिबान्यांना मिळणार्‍या पािंठब्यामुळेच अमेरिकेच्या अफगाणमधील दहशतवादविरोधी लढ्याला पाहिजे तसे यश मिळू शकले नाही. माफ करा, मी अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की, आपण अफगाणमधील लढा हरलो आहोत. आपण आता केवळ अफगाणमधून बाहेर निघण्यासाठी पळवाट शोधत आहोत, असे ते म्हणाले.
 
अमेरिकेने प्रत्यक्ष युद्धातून स्वत:ला बाजूला केल्यामुळेच अफगाणमध्ये आपल्या शत्रूंचा विजय झाला. याचा फायदा घेऊन शत्रूंनी आपल्या कारवायांचा विस्तार केला आणि स्वत:ला बळकट बनविले. परिणामी आपली इच्छाशक्ती प्रभावित झाली, असेही त्यांनी स्पष्ट केले. अजूनही वेळ गेलेली नाही. दहशतवाद्यांना आपल्या भूमीत आश्रय देणार्‍या, अन्य देशांमध्ये हल्ले करण्यासाठी त्यांचा वापर करणार्‍या पाकिस्तानसारख्या देशांच्या विरोधात अमेरिकेने कठोर पावले उचलायलाच हवी, असे मतही त्यांनी व्यक्त केले.