श्रीलंका स्फोट; भारतीय पत्रकार दानिश सिद्धीकीची सुटका
   दिनांक :04-May-2019
एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ईस्टरच्या संध्याकाळी श्रीलंकेत ८ बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटांमध्ये २५०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले . या स्फोटानंतरच्या परिस्थितीचे वार्तांकन करण्यासाठी दानिश सिद्धीकी श्रीलंकेत गेला होता. तीनच दिवसांपूर्वी त्याला परवानगीशिवाय घटनास्थळाची तपासणी केल्याबद्दल अटक करण्यात आली होती.
 
 
दानिश सिद्धीकी हा रॉयटर्स वृत्तसंस्थेचा पत्रकार आहे.  निगोम्बो शहरातील एका शाळेतील विद्यार्थी मृत्युमुखी पडले होते. त्यांची माहीती काढण्यासाठी दानिश संबंधित शाळेत गेला होता. परवानगी शिवाय तो फक्त शाळेच्या आवारात शिरलाच नाही तर त्याने तेथील फोटोही काढले होते. 
 
सध्या श्रीलंकेत आणीबाणी लागू करण्यात आली आहे. अशावेळी प्रशासनाकडून कोणताही परवाना न घेता तेथील शाळेत मुक्तपणे हिंडल्यामुळे दानिशला ताबडतोब अटक करण्यात आली. तसंच या गुन्ह्यासाठी त्याला १५ मे पर्यंत कोठडीही सुनावण्यात आली.
 
 
 
सोशल मीडियावर त्याच्या सुटकेची मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात येत होती. भारतीय प्रसारमाध्यमांतूनही त्याच्या सुटकेची मागणी जोर धरत होती. तेव्हा अखेर त्याची ओळख पटल्यामुळे २ दिवसांनंतर श्रीलंका सरकारने दानिशची सुटका केली आहे.