न्यूझीलंड खुली बॅडमिंटन स्पर्धा : भारताचे आव्हान संपुष्टात

    दिनांक :04-May-2019
ऑकलंड,
 संघर्षपूर्ण लढतीनंतर एच. एस. प्रणॉयचे न्यूझीलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत पराभव पत्करला. उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या पाचव्या मानांकित कांटा सुनेयामाविरुद्ध प्रणॉय पराभूत झाल्यामुळे स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.

 
बिगर मानांकित प्रणॉयने २१-१७ अशा फरकाने पहिला गेम जिंकत आशादायी सुरुवात केली. परंतु जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत ११व्या स्थानावर असलेल्या सुनेयामाने पुढील दोन गेममध्ये २१-१५, २१-१४ असे वर्चस्व राखताना एक तास, १३ मिनिटांत सामना जिंकला.
पहिल्या गेममध्ये १३ गुणांपर्यंत दोन्ही खेळाडूंनी कडवी लढत दिली. मग प्रणॉयने सलग चार गुण मिळवत आघाडी १७-१३पर्यंत उंचावली. मग सुनेयामाने हे अंतर १७-१८ असे कमी केले. मग प्रणॉयने खेळ उंचावत पहिला गेम जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये प्रणॉयने सुरुवातीला ४-० अशी आघाडी मिळवली. मग ही आघाडी ११-५ अशी वाढवली. परंतु नंतर प्रणॉयकडून अनेक चुका झाल्या. परिणामी आठ सलग गुणांमुळे सुनेयामाने १४-११ अशी आघाडी घेतली.
प्रणॉयने सुनेयामाला १४ गुणांवर त्याला गाठले. परंतु नंतर मात्र सुनेयामाने दिमाखात खेळ करीत गेम जिंकला. निर्णायक गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी तगडा प्रतिकार केला. १४-१४ अशा बरोबरीनंतर मात्र सुनेयामाने गेमसह सामना खिशात घातला.