मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत कुठलाही बदल नाही- तावडे

    दिनांक :04-May-2019
मुंबई : मुंबई विद्यापीठाची शनिवारी होणारी एफवायबीकॉमची परीक्षा रद्द झाल्याचा चुकीचा संदेश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या ट्विटर अकाऊंटवरील एका फोटोमध्ये फोटोशॉपद्वारे फेरफार करून पसरविला जात आहे. ही बाब निदर्शनास येताच विद्यापीठाने सर्व परीक्षा दिलेल्या वेळेवर होणार असून, कोणतीही परीक्षा रद्द झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

शिक्षणमंत्र्यांच्या ट्विटर अकाऊंटवरील फोटोची फोटोशॉप इमेज तयार करून त्याद्वारे विद्यापीठाची एफवायबीकॉमची परीक्षा रद्द झाल्याचा चुकीचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत होता. याबाबतची माहिती मिळताच विद्यापीठाने तातडीने सूचना जारी केली. त्यानुसार विद्यापीठाच्या शनिवारी होणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षा दिलेल्या वेळेवर होणार आहेत. कोणतीही परीक्षा रद्द झाली नसल्याचे, विद्यापीठाचे उपकुलसचिव विनोद माळाळे यांनी सांगितले.