विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान फलंदाजांसाठी खेळपट्टी चांगली असेल - सचिन तेंडुलकर

    दिनांक :04-May-2019
मुंबई ,
इंग्लंडमध्ये होणार्‍या विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान फलंदाजांसाठी खेळपट्टी चांगली असेल; पण गरम वातावरणामुळे चेंडू म्हणावा तसा स्विंग होणार नाही, असे मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणाला. विश्‍वचषक स्पर्धा 30 मेपासून इंग्लंड येथे सुरू होणार असून, 10 संघ यामध्ये सहभाग नोंदवणार आहेत.

वांद्रे येथील एमआयजी क्लब पॅव्हेलियनला सचिन तेंडुलकर याचे नाव देण्यात आले आहे. त्याचे अनावरण सचिनच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी तो बोलत होता. तेथे खूप गरम वातावरण असल्याचे मला सांगण्यात आले. त्यामुळे फलंदाजांसाठी चांगली विकेट असेल, असा विश्‍वास मला आहे.वातावरण ढगाळ नसल्यास खेळपट्टीत फारसा बदल होईल, असे वाटत नाही. ढगाळ वातावरण असल्यास चेंडू स्विंग होऊ शकतो; पण तो जास्त काळ स्विंग होईल, असे वाटत नाही असे सचिनने सांगितले.
भारतीय खेळाडू विराट कोहली, हार्दिक पंड्या, के. एल. राहुल आयपीएल मध्ये चांगली कामगिरी करीत आहेत. या कामगिरीचा फायदा विश्‍वचषक स्पर्धेत त्यांना होईल यावर बोलताना सचिन म्हणाला की, कोणत्याही फॉरमॅटमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे खेळाडूचा आत्मविश्‍वास दुणावतो.