आयोगाने कशाच्या आधारे राज ठाकरेंकडून खर्च मागितला

    दिनांक :04-May-2019
शरद पवार यांचा सवाल
 
मुंबई: निवडणूक आयोगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून निवडणूक सभांचा खर्च मागितला आहे. या मुद्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, राज ठाकरे स्वत: उमेदवार नाहीत, त्यांच्या पक्षाचा एकही उमेदवार नाही; मग कोणत्या आधारावर निवडणूक आयोगाने राज यांच्याकडून सभांचा खर्च मागितला, असा सवाल करत राज यांची पाठराखण केली आहे.
राज ठाकरे यांनी निवडणूक प्रचाराच्या काळात राज्यभर घेतलेल्या सभांचा खर्च आता निवडणूक आयोगाने त्यांच्याकडून मागितला आहे. भाजपाने निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिले होते. त्यात राज यांच्या सभांचा खर्च कोणत्या उमेदवाराच्या खर्चात धरायचा, असा सवाल केला होता. त्यानुसार आता आयोगाने राज यांना निवडणूक खर्चाचा तपशील देण्यास सांगितले आहे, याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले, 1977 साली आणिबाणीच्या विरोधात साहित्यिक रस्त्यावर उतरले होते. पु. ल. देशपांडे सरकारविरोधात सभा घेत होते. तेव्हा त्यांच्या सभांचा खर्च कधी आयोगाने मागितल्याचे ऐकिवात नाही. मग आता राज स्वत: उमेदवार नाहीत, वा त्यांच्या पक्षाचाही उमेदवार नाही. देशहितासाठी ते सभांमधून सर्वसामान्य जनतेला आवाहन करत होते. लोकशाहीत ते सांगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मग आयोगाने कोणत्या आधारावर सभांचा खर्च मागितला, असा सवाल शरद पवार यांनी केला.