श्रीलंकेत पुन्हा दहशतवादी हल्ले होण्याची भीती
   दिनांक :04-May-2019
कोलंबो ,
 
जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना रविवारी (21 एप्रिल) श्रीलंकेमधील कोलंबो येथे चर्च आणि हॉटेल्समध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 359 हून अधिक जणांचा मृत्यू झाला तर 500 हून अधिक जण जखमी झाले. या घटनेनंतर संपूर्ण श्रीलंकेत भीतीचे वातावरण पसरले आहे. पुन्हा दहशतवादी हल्ले होण्याची भीती शुक्रवारी (3 मे) सरकारने व्यक्त केली आहे. पोलीस, लष्कर सज्ज असून नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळांवरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
 
 
श्रीलंकेत ज्या दहशतवादी गटाने स्फोट घटवले त्याच गटातील काही दहशतवाद्यांचा कोलंबो शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांसह महत्त्वाचे पूल पुन्हा उडवून देण्याचा कट असल्याचे सरकारने म्हटले आहे. इसिसशी संबंधित नॅशनल तौहिद जमात या दहशतवादी गटाने श्रीलंकेत बॉम्बस्फोट उडवले होते. या पार्श्वभूमीवर पुन्हा लष्कर आणि पोलिसांनी संयुक्तपणे शोधमोहिम सुरू केल्या आहेत. या साखळी बॉम्बस्फोटांचा सूत्रधार जहरान हाश्मी याने सोशल मीडियाचा वापर केल्याचे समोर आले आहे. अनेक महिन्यांपासून सोशल मीडियाच्या चॅटरूममधून तो हल्लेखोरांना तयार करत होता. त्यासाठी त्याने फेसबुक आणि यूट्यूबचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे.