शिक्षण विभागाच्या अडेलतट्टू धोरणाचा शिक्षक संघटनांनी केला निषेध
   दिनांक :04-May-2019
वाशीम: शैक्षणिक सत्रातील सुट्टीचे नियोजन करण्यापूर्वी सत्र 2018-19मध्ये झालेली चूक दुरुस्त करून 4 मे पासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यास शिक्षणाधीकारी यांनी नकार दिल्याच्या निषेधार्थ विविध शिक्षक व शिक्षकेतर संघटनेचे पदाधिकारी यांनी सभात्याग करीत प्रशासनाच्या अडेलतट्तू पणाचा जाहीर निषेध केला.
 

 
 
शैक्षणिक सत्र ठरविण्यासाठी शिक्षणाधिकारी यांनी विविध शिक्षक संघटना पदाधिकारी यांची यापूर्वी दोन वेळा सभा बोलविली होती. तथापि शिक्षण संचालक यांनी दिलेल्या मार्गदर्शनातिल 17 क्रमांकच्या मुद्यानुसार शैक्षणिक सत्राचे नियोजन करून 10 तारखेचे सत्र कमी करून 4 पर्यंत करावे आणि त्यानंतर सत्र 2019-20 चे नियोजन करावे अशी मागणी सर्वच संघटनानी केली. मात्र शिक्षणाधिकारी यांनी यापूर्वी त्यावर विचार करायला वेळ मागितला होता. त्यामुळे 3 मे रोजी पुन्हा कार्यालयात सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला मु. अ. संघ, पश्चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, वि. ज्यू. टीचर्स असोसिएशन, शिक्षकेतर संघटना, म. रा. शिक्षक परिषद, शिक्षक आघाडी, शिक्षक महासंघ आदी संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पदाधिकारी यांनी पुन्हा सत्र कमी करण्याची व नियमानुसार नियोजन करण्याची मागणी रेटून धरली. परंतु, शिक्षणाधिकारी यांनी नकार देताच पदाधिकारी यांनी आक्रमक पवित्रा घेत सभात्याग करीत जिल्हा परिषदे च्या आवारात निदर्शने केली.
तसेच यापुढे शिक्षणाधिकारी यांनी आपल्या मनाने नियोजन केल्यास कोणत्याही संघटनेची त्याला सहमती असणार नाही हे ठासून सांगण्यात आले. यावेळी अविनाश पसारकर, प्राध्यापक अनिल काळे, विनायक उज्जैनकर, राजकुमार बोनकिले, प्राचार्य साहेबराव जाधव, रमेश आरु, श्रीकांत जोशी, प्रशांत कव्हर, प्रवीण कदम, राजेश खाडे, रामराव कायंदे, राम अवचार, प्रफुल काळे, बोराळकर, सरनाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते.