...म्हणून स्वीकारली 'तुला पाहते रे'ची ऑफर
   दिनांक :04-May-2019
छोट्या पडद्यावर अल्पावधीत लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे ‘तुला पाहते रे’. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. विशेष म्हणजे विक्रांत सरंजामेची भूमिका साकारत असलेला सुबोध भावे आणि इशाची भूमिका साकारणारी गायत्री दातार यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना फार आवडली आहे. या मालिकेत येणाऱ्या नवनवीन वळणांमुळे प्रेक्षकांमध्ये कथानकाविषयीची उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकतंच मालिकेत राजनंदिनी या भूमिकेची एण्ट्री झाली आहे. मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि त्यांचे आभार मानण्यासाठी शिल्पा तुळस्कर, सुबोध भावे आणि गायत्री दातार या तिघांनी नुकतंच फेसबुक लाइव्हद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी सुबोधने मालिकेची ऑफर स्वीकारण्यामागचं कारण सांगितलं.
 
 
भूमिका, निर्मातेमित्र आणि आवडते दिग्दर्शक या कारणांमुळे मालिकेची ऑफर स्वीकारल्याचं सुबोधनं सांगितलं. गायत्रीचं सुबोध भावेसोबत काम करण्याच लहानपणापासून स्वप्न होतं. त्यामुळे कदाचित गायत्रीचं स्वप्न पूर्ण करायलाही मी मालिका स्वीकारली असं तो गमतीशीरपणे म्हणाला. ‘मला त्या काळात मालिकेत काम करायची इच्छा होती. मालिका हे माध्यम मला खूप आवडतं आणि निर्माता, दिग्दर्शक, कलाकार अशा सगळ्याच गोष्टी जुळल्या होत्या, त्यामुळे मी मालिका स्वीकारली,’ असं त्याने पुढे सांगितलं.
अभिनेत्री शिल्पा तुळस्करनेही यावेळी मालिका स्वीकारण्यामागचं कारण सांगितलं. ‘बऱ्याच वर्षांनी एक मराठी मालिकेची ऑफर आली होती. राजनंदिनीच्या भूमिकेविषयी मला आधीच समजावण्यात आलं होतं. त्यामुळे छोट्या पडद्यावर कमबॅक करायचं असेल तर यापेक्षा दमदार दुसरी भूमिका असूच शकत नाही असं मला वाटलं,’ असं तिने सांगितलं.