विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत हार्दिकची भूमिका मोलाची - युवराज

    दिनांक :04-May-2019
मुंबई,
 आयपीएलमध्ये धडाकेबाज फलंदाज, उपयुक्त गोलंदाज आणि चपळ क्षेत्ररक्षक अशी तिहेरी भूमिकेत दिसणारा हार्दिक पंडय़ा आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतासाठी मोलाची भूमिका बजावेल, अशा शब्दांत २०११च्या विश्वचषकात सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळवणाऱ्या युवराज सिंगने पंडय़ाची पाठ थोपटली.
 
 
इंग्लंड येथे ३० मेपासून विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेसाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघात अनेक नामांकित खेळाडू असले तरी युवराजने विश्वविजेतेपदासाठी इंग्लंडला सर्वाधिक पसंती दर्शवली आहे. ‘मनीग्राम’तर्फे सुरू करण्यात आलेल्या एका अभियानाच्या अनावरणप्रसंगी युवराज उपस्थित होता.
विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघाविषयी विचारले असता युवराज म्हणाला, ‘‘अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असल्यामुळे यंदा भारताचा संघ समतोल आहे. निवड समितीने विचार करून इंग्लंडच्या परिस्थितीला साजेसा संघ निवडला आहे. त्याशिवाय २०१३ व २०१७च्या इंग्लंडमध्येच झालेल्या चॅम्पियन्स करंडकात भारताने दमदार कामगिरी केली होती. विश्वचषकाचे दडपण वेगळे असले तरी भारत या वेळी अंतिम फेरी नक्कीच गाठेल, असे मला वाटते.’’
त्याच्या समावेशामुळे भारताला कितपत फायदा होईल, याविषयी विचारले असता युवराज म्हणाला, ‘‘निश्चितच हार्दिक भारताला गवसलेला मौल्यवान खेळाडू आहे. गुरुवारी हैदराबादविरुद्धच्या सामन्यानंतर मी स्वत: हार्दिकशी संवाद साधून विश्वचषकासाठी भारतीय संघाला त्याचे योगदान किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव करून दिली. यंदाच्या हंगामात दडपणाच्या परिस्थितीतसुद्धा मोठे फटके खेळण्याची कला हार्दिकने दाखवल्यामुळे विश्वचषकात तो भारताचा हुकमी एक्का असेल, यात शंका नाही.’’ त्याशिवाय कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध हार्दिकने साकारलेली खेळी मी आजतागायत पाहिलेली ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी होती, असे युवराजने सांगितले.
चौथ्या क्रमांकाविषयी मात्र युवराजने बोलण्याचे टाळले. याव्यतिरिक्त, जसप्रीत बुमराला आपण सराव करतानाही सामोरे जात नाही. त्याशिवाय इंग्लंडच्या खेळपट्टय़ांवर त्याची गोलंदाजी खेळणे फलंदाजांना आव्हानात्मक असेल, असे युवराजने सांगितले.
‘‘विश्वचषकासाठी इंग्लंडला मी विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानतो. भारतालासुद्धा जेतेपदाची संधी आहेच. त्याशिवाय स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांच्या पुनरागमनामुळे ऑस्ट्रेलियादेखील उपांत्य फेरीत स्थान मिळवेल,’’ असे ३७ वर्षीय युवराजने सांगितले.