अमरावती विभागात फक्त १५.५१ टक्के जलसाठा शिल्लक
   दिनांक :05-May-2019
502 प्रकल्पांची जलपातळी चिंताजनक
 
अमरावती: तीव्र तापमानामुळे हैराण झालेल्या पश्चिम विदर्भाला आता पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागणार आहे. अमरावती विभागातल्या पाच जिल्ह्यातील मोठे, मध्यम, लघु अशा एकूण 502 प्रकल्पात फक्त 511.30 द.ल.घ.मी. पाणीसाठा शिल्लक आहे. त्याची टक्केवारी 15.51 आहे. गुरूवार 2 मे रोजी हा साप्ताहीक आढावा घेण्यात आला. गत आठवड्याच्या तुलनेत तो 20 द.ल.घ.मी.ने कमी झाला आहे. गेल्या वर्षी याच तारखेपर्यंत या प्रकल्पांमध्ये 17.93 टक्के जलसाठा होता. त्यामुळे तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे.
 

 
 
अमरावती जिल्ह्यात मोठा 1, मध्यम 4, लघु 80 असे एकूण 85 प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये विद्यमान स्थितीत 178.67 द.ल.घ.मी. पाणी आहे. त्याची टक्केवारी 19.30 आहे. गेल्यावर्षी ती 34.02 होती. यवतमाळ जिल्ह्यात मोठे 3, मध्यम 6, लघु 111 असे एकूण 120 प्रकल्प आहे. या प्रकल्पांमध्ये 220.84 द.ल.घ.मी. पाणी आहे. त्याची टक्केवारी 21.53 आहे. गेल्यावर्षी ती फक्त 12.92 होती. यंदा त्यात 10 टक्क्याची वाढ आहे.
अकोला जिल्ह्यात 2 मोठे, 4 मध्यम, 40 लघु असे एकूण 46 प्रकल्प आहे. त्यात फक्त 51.94 द.ल.घ.मी. जलसाठा शिल्लक आहे. त्याची टक्केवारी 14.07 आहे. गेल्यावर्षी ती 18.16 टक्के होती. वाशीम जिल्ह्यात मध्यम 3, लघु 143 असे एकूण 146 प्रकल्प आहे. या प्रकल्पांमध्ये 35.98 द.ल.घ.मी. पाणी शिल्लक आहे. टक्केवारीत ते 8.11 आहे. गेल्या वर्षी ते 7.80 टक्के होते.
बुलढाणा जिल्ह्यात फारच बिकट स्थिती आहे. येथे 3 मोठे, 7 मध्यम, 95 लघु असे एकूण 105 प्रकल्प आहे. या प्रकल्पांमध्ये 23.87 द.ल.घ.मी. पाणी आहे. त्याची टक्केवारी फक्त 4.47 आहे. गेल्यावर्षी ती 7.91 होती. बुलढाणा, वाशीम, अकोला या जिल्ह्यांची स्थिती फारच गंभीर आहे. उद्भवलेल्या स्थितीवर प्रशासनाला गतीने उपायोजना कराव्या लागणार आहे.