राज ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यास मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण

    दिनांक :05-May-2019
मुंबई,
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात व्हॉट्सअ‍ॅपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या विरोधात अंबरनाथमध्ये राहणाऱ्या संदीप तिवारी या तरुणाने एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. 

 
अंबरनाथच्या पूर्वेकडील धारा रेसिडेन्सी संकुलात शनिवारी हा प्रकार घडला. संदीप तिवारी या तरुणाने एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर राज ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यामुळे आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी संदीप तिवारीला मनसेच्या कार्यालयात आणून उठाबश्या काढायला लावल्या आणि मारहाण केली. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दुसरीकडे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या घटनेचे समर्थन केले असून, ‘टीका करावी, टीका करणे हा लोकशाहीचा हक्क आहे, पण जर कमरेखालची टीका कोणी करणार असेल तर त्यांना असाच धडा शिकवला जाईल’ असा इशारा प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे.
याआधीही राज ठाकरेंबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह लिखाण केल्याबद्दल नाशिकमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी एका तरुणाला चपलेने चोप दिला होता, तर पुणे, औरंगाबादेतही एकावर शाईफेक करुन मारहाण करण्यात आली होती.