IPL2019; राहुलच्या धडाकेबाज खेळीने; चेन्नईचा ६ गड्यांनी पराभव

    दिनांक :05-May-2019
मोहाली,
किंग्ज इलेव्हन पंजाबचा सलामीवीर केएल राहुलच्या ३६ चेंडूत केलेल्या ७१ धावांच्या वादळी खेळीमुळे पंजाबने चेन्नईचा ६ गडी आणि १२ चेंडू राखून पारभव केला. चेन्नईचा फिरकीपटू हरभजनसिंगने लागोपाठ तीन गडी बाद करत सामन्यात रंगत आणली खरी पण, पूरनने ३६ धावांची खेळी करत पंजाबचा विजय निश्चित केला. सीएसकेकडून फाफ ड्युप्लिसिस आणि रैनाने दुसऱ्या गड्यासाठी १२० धावांची भागिदारी केली. यात ड्युप्लिसिसचे शतक अवघ्या ४ धावांनी हुकले तर रैनाने अर्धशतक करुन त्याला चांगली साथ दिली.

 
चेन्नईच्या १७१ धावांचा पाठलाग करताना पंजाबच्या ख्रिस गेल आणि लोकेश राहुल या सालमी जोडीनेही दमदार सुरुवात केली. विशेष म्हणजे ख्रिस गेल संयमी फलंदाजी करत होता आणि लोकेश राहुल आक्रमक पवित्र्यात फलंदाजी करत होता. यामुळे पंजाबने चौथ्या षटकातच धावफलकावर अर्धशतक लावले. यातील ४६ धावांचा वाटा एकट्या राहुलचा होता. त्याने १९ चेंडूतच आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने हरभजनच्या एकाच षटकात २४ धावा चोपल्या. राहुलच्या या अर्धशतकाच्या जोरावर पंजाबने पॉवर प्लेमध्ये ६८ धावा केल्या होत्या.
पॉवर प्ले संपल्यानंतर गेलने आपला पॉवर प्ले सुरु केला. त्याने आक्रमक फलंदाजी करत पॉवर प्लेनंतरच्या ताहीरच्या षटकात १७ धावा केल्या. पण, त्यानंतर सीएसकेच्या गोलंदाजांनी या सालामीवीरांच्या मुसक्या आवळल्या. ११ व्या षटकात शतकी सलामी दिल्यानंतर अखेर हरभजनने मोहालीत भांगडा करण्यास सुरुवात केली. त्याने पहिल्यांदा ७१ धावांवर खेळत असलेल्या राहुलला बाद केले. दुसऱ्याच चेंडूवर गेललाही (२८) बाद करुन पंजाबचे तुफान फटकेबाजी करणाऱ्या सलामीवीरींना माघारी धाडले. त्यानंतर आपल्या पुढच्याच षटकात मयांक अग्रवालला बाद करत हरभजनने पंजाबला तिसरा धक्का दिला. पॉवर प्लेमध्ये एका षटकात २४ धावा देणाऱ्या हरभजनने जबरदस्त कमबॅक करत पाठोपाठ तीन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये धाडले.
सलग तीन विकेट पडल्याने पंजाबची धावगती मंदावली. पण, राहुल आणि गेलने दिलेल्या धमाकेदार सुरुवातीमुळे हरभजनच्या धक्यांचा फारसा परिणाम पंजाबवर झाला नाही. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या पुरनने ३६ धावांची छोटी पण, आक्रमक खेळी करत पंजाबला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. अखेर कुरनने विजयी चौकार मारला आणि पंजाबने ६ विकेट्सनी सामना जिंकला.
तत्पूर्वी, किंग्ज इलेव्हन पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोहालीच्या बॅटिंग विकेटवर चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर फाफ ड्युप्लिसिसने दमदार सुरुवात केली. पण, दुसरा सलामीवीर शेन वॉट्सन अडखळत खेळत होता. अखेर सॅम कुरनने त्याचा ७ धावांवर त्रिफळा उडवला.
वॉट्सन बाद झाल्यानंतर आलेल्या सुरेश रैनाने झपाट्याने धावगती वाढवण्यास सुरुवात केली. त्याने षटकात एक मोठा शॉट खेळण्याची स्ट्रॅटेजी वापरत ड्युप्लिसिसला चांगली साथ दिली. त्यामुळे सीएसकेला १० षटकात ७९ धावांपर्यंत मजल मारता आली. दरम्यान, फाफ ड्युप्लिसिसने आपले अर्धशतक पूर्ण केले. पाठोपाठ सुरेश रैनानेही आपले अर्धशतक पूर्ण केले. दोघांनीही आपल्या अर्धशतकानंतर आपल्या आक्रमणाची धार वाढवली. विशेषकरुन ड्युप्लिसिसने धडाकेबाज फलंदाजी करण्यास सुरुवात केली. त्याच्या या आक्रमक फलंदाजीमुळे १७ व्या षटकात सीएसकेने १५० धावांचा टप्पा ओलांडला. दरम्यान, कुरनने रैनाला बाद करुन मार खाणाऱ्या पंजाबला दिलासा दिला.
रैना बाद झाल्यानंतर धोनी मैदानात आला. आता धोनी आणि ड्युप्लिसिस धावांचा पाऊस पाडणार असे वाटत असतानाच सॅम कुरनने सीएसकेला पुन्हा धक्का दिला. त्याने शतकाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या ड्युप्लिसिसचा एका अप्रतिम यॉर्करवर त्रिफळा उडवला. फाफचे शतक अवघ्या ४ धावांनी हुकले. त्याने ५५ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ९६ धावा केल्या. ड्युप्लिसिस बाद झाल्यानंतर अखेरच्या षटकात फटकेबाजी करण्याच्या नादात रायडु आणि केदार जाधव असे दोन फलंदाज सीएसकेने गमावले. २० षटकाअखेर चेन्नईला ५ गड्यांच्या मोबदल्यात १७० धावांपर्यंतच मजल मारता आली.