जमिनीवरील विमानांसाठी एअर इंडियाची ५०० कोटींची तरतूद

    दिनांक :05-May-2019
संधीचा लाभ घेणार
 
मुंबई: जेट एअरवेजचे पतन झाल्यानंतर व्यावसायिक संधी खुणावू लागल्याने एअर इंडियाने जमिनीवरील 19 विमाने सक्रिय करण्यासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
महागडे सुटे भाग आणि इंजीनमध्ये पूर्णपणे झालेल्या बिघाडासह वेगवेगळ्या कारणांमुळे एअर इंडियाची 19 विमाने सध्या जमिनीवरच आहेत. सध्या मागणी वाढली असून, पर्यटनाचा मोसम सुरू झाला आहे. त्यादृष्टीने कंपनीने जमिनीवरील विमाने सुधरवण्यासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
 

 
 
 
बाजारातील हिस्सा वाढवण्यासाठी आणि व्यावसायिक संधी साधण्यासाठी ही योग्य वेळ आहे. धोरणात्मक पद्धतीने आमच्या सर्वच विमानांचा कौशल्याने वापर केला जात आहे. आम्हाला आणखी विमानांची गरज असून, जमिनीवरील विमानांचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती एअर इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.
येत्या काही दिवसांत दोन विमाने ताफ्यात दाखल होतील. बाजारातील हिस्सा वाढवण्यासाठी या विमानांचा वापर केला जाईल. नव्याने निधी मिळाल्याने आता जमिनीवरील सर्व विमाने ऑगस्टपूर्वी कार्यान्वित होतील, असेही या अधिकार्‍याने सांगितले.
एअर इंडियाच्या 10 पेक्षा जास्त ए-320 एअरबस, बोईंग-787-800 ड्रीमलायनर आणि काही बोईंग-777 विमाने जमिनीवर आहेत. केंद्र सरकारने केलेल्या विनंतीनुसार सध्या एअर इंडिया आपल्या ताफ्यातील विमानांची संख्या वाढवत आहे.
एअर इंडिया समूहातील एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेस, अलायन्स एअरच्या ताफ्यात सध्या एकूण 160 विमाने असून, त्यापैकी 122 विमाने नियमित उड्डाणे भरत आहेत. यातील 78 विमानांचा देशांतर्गत, तर 44 विमानांचा आंतरराष्ट्रीय मार्गांवर वापर केला जात आहे. या व्यतिरिक्त कंपनीने आणखी चालक दलाचे सदस्य आणि वैमानिकांना सेवेत सामावून घेण्याचा निर्णयही घेतला आहे. बंद पडलेल्या जेट एअरवेजमधील 200 चालक दलाचे सदस्य सामावून घेण्याची योजनाही एअर इंडियाने आखली आहे.