निसर्गाक्षरानं केलेल्या नोंदी...
   दिनांक :05-May-2019
•मनीषा अतुल
- 9823262966
 
आम्हाला इथे पोहोचून जेमतेम दोन दिवस तर झाले आहेत खरे, पण शाल्मलीसाठी हे दिवस आयुष्यभराचा आनंद घेऊन आल्यासारखे वाटताहेत. आपण चित्रात काढायचो ना तसेच डोंगर, दर्‍या, विद्याचा खूप जुना वाडा, बाजूने वाहणारी नदी... काय नाहीये इथे? निसर्गाचा स्वर्गच आहे हा! आणि शाल्मली प्रथमच हे सगळं अनुभवतेय्‌, तेही वयाच्या चौदाव्या वर्षी! शहरात सगळं बालपण गेलं तिचं. नातेवाईक सगळे तिकडेच. शाळेच्या सगळ्या सुट्‌ट्या कसलेतरी क्लासेस, नाहीतर शिबिरं करण्यात संपून जायच्या. आभानं एकदा खंत बोलून दाखवली मला आणि अनायासे विद्याचा लकडा होताच मागे, की इथं या म्हणून, तर आलं जुळून सगळं.
 
आता खरी गंमत येतेय्‌ ती या मायलेकींची जोडगोळी बघून. आभा लहानशी मुलगी झालीये, तिच्या शाल्मली एवढी. आणि ते सगळं करायला बघते आहे जे आम्ही लहानपणी करायचो. तिला सगळा भूतकाळ जगून घ्यायचाय्‌. आयुष्यातले मध्ये गेलेले पंचेवीस वर्षे तिला पुसून टाकायचे आहेत आणि मुलीच्या भूतकाळासाठी हे क्षण निसर्गाक्षरानं कोरले जावेत, याकरिता तिची जी धडपड चाललीये ना, ती फार देखणी आहे. तू म्हणतोस, ‘‘अगं, आईवडील आपल्या मुलांना नेहमीच स्वत:जवळचं सगळं उत्तम आणि उत्कृष्ट देण्याच्या प्रयत्नात असतात. अगदी स्वत: अनुभवलेले उत्तम क्षणसुद्धा त्यांना भूतकाळातून उचलून आणून यांना जगवून द्यावेसे वाटत असतात.’’ तीच कसरत बघतेय्‌ तिची सारखी. ती शामाला सारखी हे करून बघ, ते करून बघ, म्हणून सांगतीये. शाल्मली झिडकारतीये हिच्या पद्धतीला. ती आपल्याच पद्धतीने बिचकत बिचकत काहीतरी हळूच करून बघते आणि त्यातच प्रचंड आनंद घेेते. सारखं चीत्कारणं चाललं आहे तिचं. तिला हे जग अद्भुत वाटतंय्‌- आधुनिक यंत्राचा शोध लागण्यापूर्वीच. इतकं काही मागास गाव नाहीये रे हे, पण शाल्मलीच्या दृष्टीने बॅकवर्डच की. पण, गंमत म्हणजे तिचं लक्ष इथे काय नाही, त्यापेक्षा इथे किती काही वेगळं आहे, नवंच आहे, याकडे आहे आणि हेच खूप छान आहे. आभाला वाटतं की, ती सांगते त्या पद्धतीने ही अनुभव घेईल, तर कैकपट मजा येईल. मग दोघींची बाचाबाची होते. परत एकी. असं बरंच मजेदार गुळपीठ सुरू आहे.
 
आता बघ ना, काल टेकडीकडे गेलो. तिथे पायथ्याशी पिवळ्या फुलांच्या झुडुपांनी अख्खा परिसर फुललेला आहे. पिवळीजर्द फुले तुरे काढून उभी. मधूनमधून जांभळट फुलांनी नाजूक डिझाईन दिलेलं आणि फुलपाखरांचे थवेच्या थवे! एवढी फुलपाखरं एकदम नजरेला पडावी, तीही कुणाच्या? तर जिने आयुष्यात खरोखरीचं फुलपाखरूच मुळात पहिल्यांदा जवळून बघितलंय! ‘‘अय्या, मम्मा, बघ ना, किती सारे बटरफ्लाईज! ओ माय गॉड! कसले जवळनं उडताहेत ते बघ ना. मी हात लावू त्यांना?’’ असं म्हणून बया धावली हाय हिल्स सँडल्स घालून. आभा ओरडली, ‘‘अगं शामा, पडशील. या चपला घाल माझ्या. सँडल्स दे मला.’’ ‘‘मम्मा श्शी! तुझ्या चप्पल्स नको.’’ ‘‘अगं घाल, काही कुणी बघत नाही इथे... आणि धाव मस्त. बघू किती पाखरं पकडतेस. आम्ही ना...’’ थोडा वेळ पोरीने दाद दिली नाही. पण, या सँडल्सने धावलं तर काय, इथे धड चालणंही कठीण आहे, हे लक्षात आल्यावर तिनं त्या फेकून दिल्या आणि कधी नव्हे ते आईच्या सपाट, ओल्ड फॅशन चपलांना चरणस्पर्श केला. तेव्हापसून त्या तिच्याच झाल्यात. इकडे दिवसभर तिच्या सँडल्स घालून, फेंगडे चालून आभाची मात्र चांगलीच फजिती झालीये. पण, मुलीला मिळणार्‍या अद्भुत आनंदामुळे ही पीडा काहीच वाटत नाहीये तिला.रात्री पोरगी झोपल्यावर उलट तिचीच पावले चुरत म्हणतीये कशी, ‘‘काय वेडी आहे न गं मी? इथे यायचं तर हिचे स्पोर्टस्‌ शूज नको का घ्यायला हवे होते? बघ ना, तिला गं काय ठाऊक, पार्टीला निघावं तशा तयारीनं आली ती बिचारी. मी वेंधळी, माझ्याच गुंतावळ्यात.’’ ‘‘असू दे गं. ती तुझ्या चपलांत कंफर्टेबल आहे. तू तुझंच बघ, काय करायचं ते.’’ ‘‘काय करणार? उद्या दुकान शोधू गावात आणि आणू स्लिपर्स घालायला.’’
 
दुपारला विद्याने बिट्‌ट्यांचा बेत केला. सरसर पेटलेल्या चुलीपाशी गप्पा सुरू होत्या. शामाला कोण अप्रूप वाटलं चुलीचं. फुंकणी घेऊन बासरीच्या तालात रमल्या बाईसाहेब. डोळ्या-नाकातून पाणी. तिला बिट्‌ट्या करून बघ म्हणून आभाचा हट्‌ट वरून. ‘‘जा शामा, हात धुवून ये. वळून बघ एखादी बिट्‌टी. मी खाईल तुझ्या हातची.’’ शामाने भाजण्यापूर्वीच काळी पडलेली आणि भाजल्यावरही कच्ची राहिलेली ती बिट्‌टी आईने प्रसादासारखी खाल्ली मग! आणि ते भाजण्याच्या वेळचा तो अपूर्व गोंधळ! विद्यानं निखारे ओढून दिले बाहेर आणि त्यात त्या राजकन्येच्या एकुलत्या एक बिट्‌टीनं अख्खा तासभर घेतला असेल.
 
आता शामाची भीड चेपलीये. सुरुवातीचा विरोध कुठल्याकुठे पळून गेलाय्‌. ती गुंगून गेलीय्‌ इथल्या वातावरणात. गावातल्या मुलांसोबत हुंदडतीये चक्क आता. सकाळी खेळताना धावत आली व आईला म्हणाली, ‘‘मम्मी, तुझा मोबाईल दे पटकन.’’ आभा म्हणाली, ‘‘अगं, इथे नेटवर्क नाहीये आणि आता फोनकडे अजीबात बघायचं नाही.’’ तर म्हणते कशी, ‘‘अगं मला फोटो काढायला हवाय्‌. त्या एका घरावर ना, एक आंटी ‘डंग केक’ बनवून वॉलवर स्टिक करतीये. ती चक्क काऊ डंगमध्ये हात घालून कालवतीये ते!’’ ती आश्चर्यानं िंकचाळून सांगत होती. तिला त्या गवर्‍यांचा नि ते साहस करणार्‍या त्या बाईचा फोटो हवा होता. नंतर पोरांनी कच्च्या कैर्‍या आणल्या गोळा करून. बाळकैर्‍याच होत्या. आभा म्हणाली, ‘‘खाऊन बघ.’’ ‘‘मम्मी, कशी खायची?’’ ‘‘अगं, ही अशी कच्चीच खायची मीठ लावून. मिठाची बरणी घे इकडे.‘’ ‘‘ओके. नाईफ कुठाय्‌ आंटी?’’ ‘‘बावळे, चिरायची नसते ती. ही अशीच फोडायची दातांनी.’’ असं म्हणत तिने कच्चकन कैरी फोडली आणि दातांची कळ घेऊन बसलीये तेव्हाची. शिवाय ओठाकडेला तेल लागण्यानं उबजलंय ते निराळं. पण, त्यातही मुलीनं त्या तुरट कैरीचा स्वाद घेतला, हा आनंद चेहर्‍यावरून अजून ओसंडतोय्‌ तिच्या. मला बालपणीची आभा आठवतीये. वादळ आलं की मी, विद्या आणि आभा बाहेर धावत सुटायचो. वेगवेगळ्या झाडांच्या कैर्‍या गोळा करायचो. आभा फार चपळ, हिचा ओचा नेहमीच भरलेला असायचा. आम्ही मागल्या अंगणात बसायचो. चिमणीच्या दाताने प्रत्येक कैरी फोडून चव घ्यायची. मग उबजलेली तोंडं घेऊन मिरवायचं आपलं शौर्य काही दिवस.
 
आज मुलीला हे सगळं मिळावं म्हणून धडपडतीये ती. आणि दु:खीपण होतीये की, हे सगळं तसंच्या तसं नाही नं होतंय्‌. कसं होणार रे? इतकं होतंय्‌ हेही नशीबच नाही का? आता तर तिला भीती वाटतेय्‌ की, हे नवं दु:ख तर ती देत नाहीये ना मुलीला? जोवर चांगलं काय हे ठाऊकच नव्हतं, तोवर ती त्या सिमेंटी वास्तवातही आनंदी होती. आता ही निसर्गाची चव तिला एकदा मिळाली, तर पुढे किती त्रास होईल तिला त्या शहरी रटाळ रुटीनमध्ये जुळवून घ्यायला? मी म्हणाले, ‘‘काही होणार नाही त्रास. ते जगणं तिच्यासाठी वास्तव आहे. ती घडलीच तिथे आहे. हे दिवस तिच्यासाठी बदल आहेत आणि चार दिवस बदल म्हणूनच तिने तो स्वीकारला आहे. नवं आहे म्हणून अप्रूप आहे. आता आपलंच बघ ना, आपल्या आई-वडिलांनी ठरवलं की, यांना नको खेड्यातलं कष्टाचं जीवन. आणि शहरात लग्नं करून दिलीत. आपणही आधुनिक झालो.
 
आपल्या दृष्टीनेही पुढे जाणं, सुधारणा होणं म्हणजे सोयी-सुविधाच होत्या ना? आपणही तर ही गावं आठवणीतच सजवून ठेवलीत. चार दिवसांचं अप्रूप बनवून ठेवलीत. तू तर लग्न झाल्यापासून फिरकलीदेखील नाहीस इकडे. तुझा नवरा एका सुट्टीत नेतो म्हणाला, तर दुबईचं काढलंस आणि मिरवूनही घेतलं तिथलं ऐश्वर्य कितीक महिने. तेव्हा नाही वाटलं तुला, की शामाला दाखवावं सगळं. खरं सांगायचं तर आपल्याही अंगवळणी पडलंय्‌ तेच जगणं. काळजी करू नकोस. तू जे करतीयेस ते तिच्या आठवणींना समृद्ध करायला पुरेसं आहे आणि तिला दरवर्षी अशा ठिकाणी खेचून न्यायलाही प्रेरणादायी ठरेल. जे नाहीये त्याची खंत आपल्याला आहे. आपली मुले तर त्या दु:खापासूनसुद्धा वंचित आहेत खरेतर.
तिला समजावलं रे, पण मलाही आतून तेच वाटतं आहे. किती काही गमावलंं या मुलांनी. जेव्हा याची जाणीव होईल, तेव्हा ते आपल्याला माफ करू शकतील?

(लेखिका साहित्यिक आहेत.)