मराठी पराक्रमाची शर्थ 'पावनखिंड'
   दिनांक :05-May-2019
शिवदीपस्तंभ 
डॉ. सुमंत दत्ता टेकाडे
9923839490
 
महाराजांनी सिद्दी जौहरची कशी फजिती केली, ते आपण मागील लेखात पहिले. आता तर राजे फार दूर निघून गेले होते. मसूदने अजून त्वेषाने पाठलाग सुरू केला. राजांची तुकडी आता मठ गजापूरजवळ पोहोचली. अजून फक्त ८ मैल म्हणजे १३ किलोमीटर अंतर उरलेले होते. आता वेगाने निघायचे अन्‌ विशाळगड गाठायचा, एवढेच काम शिल्लक राहिले होते. राजांचे निर्दोष नियोजन सफल झाले होते. मराठ्यांचा उत्साह त्या थकव्यातही ओसंडून वाहत होता. एक अशक्यप्राय गोष्ट त्यांनी जीवावर उदार होऊन प्रत्यक्षात आणली होती. आणि एवढ्यात घात झाला. मसूदच्या घोडदळाचा आवाज कानी पडू लागला. सारेच शहारले. आता शेवटच्या क्षणी शत्रू अगदी हाकेच्या अंतरावर येऊन ठेपला होता. विचार करायलाही वेळ नव्हता. 
 

 
बाजीप्रभू महाराजांना म्हणाले की- राजे, तुम्ही तीनशे सवंगड्यांंनिशी पुढे विशाळगडाकडे निघा. आम्ही तीनशे लोकांनीशी खिंड  लढवतो. दोन प्रहरपावेतो (सहा तास) आम्ही शत्रूस राजांच्या पाठीवर येऊ देत नाही. आम्ही साहेब कामावरी खुशाल मरतो. पण राजे मानायला तयार होणे शक्यच नव्हते. आपल्या सहकार्‍यांचा जीव धोक्यात घालून स्वतः पळून जाण्याचा सुलतानी स्वभाव महाराजांचा कधीही नव्हता. त्यामुळे राजे मागे वळायला तयार होईना. आतापावेतो मसूदची पहिली तुकडी घोडखिंडीला येऊन भिडली होती अन्‌ लढाईला तोंड फुटले होते.
 
राजांप्रमाणेच बाजींनाही संकटाचे गांभीर्य माहिती होते पण इथे स्वतःच्या प्राणांपेक्षा स्वराज्याचे प्राण महत्त्वाचे होते. स्वराज्याचे प्राण होते शिवाजीराजे! बाजींनी आग्रहपूर्वक राजांचे मन आणि त्यांचे पाय विशाळगडाकडे वळविले. असे ठरले की राजांनी गडावर पोहोचताच तोफांचे तीन बार काढावे व मग बाजी अन्‌ त्यांच्या लोकांनीही माघारी गडाकडे यावे. आपल्या सहकार्‍यांच्या पुढ्यात काय वाढले आहे, याची राजांना संपूर्ण जाणीव होती. राजे कठोर अंतःकरणाने पुढे निघाले खरे, पण रथाचे अश्व जसे पुढे दौडत जातात अन्‌ चाके मात्र मागे मागे रेंगाळत राहतात. तद्वत राजांचे शरीर कर्तव्यापूर्ततेसाठी पुढे निघाले होते पण त्यांचे मन मात्र मागे घोडखिंडीत रेंगाळत होते. 

 
राजे निघाले. बाजींनी समाधानाचा एक श्वास घेतला आणि लगेच युद्धाचा पवित्रा घेतला. मागे जवळपास एक-सव्वा किलोमीटरची घोडखिंड उभी होती. बाजींची योजना ठरली होती. सुरुवातीच्या तुकडीला बाजींच्या आघाडीने फोडून काढले होते. दोन्ही सेनांमध्ये फरक होता. बाजींची फौज जवळजवळ १०-११ तास दौडत आलेली होती तर मसूदची फौज ताज्या दमाची व घोड्यावर आली होती. मराठे फक्त तीनशेच्या घरात होते तर मसूद सेना तीन हजारावर होती. मराठे दात ओठ खाऊन लढत होते. संख्येने कमी असले तरी त्यांचा प्रतिकार अतिशय तिखट होता. स्वतः बाजीप्रभू आपल्या दोन्ही हातांमध्ये दोन दांडपट्टे घेऊन लढत होते. त्यांचा धडाका जबरदस्त होता. आवेश तर इतका विलक्षण होता की आज शीर कटून पडले तरी चालेल पण धड लढत राहील. खबरदार जर शत्रूच्या एकाही माणसाला एक पाऊल जरी आमच्या राजाकडे टाकू दिले तर. घोडखिंडीमध्ये ऐन पावसाळ्यात रंगपंचमी सुरू होती. एकएका मावळ्यास पाच-पाच, दहा-दहा यवन घेरून हल्ला करत होते. आणि तरीही तो एक एक मावळा एका हाती ढाल अन्‌ एका हाती तलवार घेऊन त्या दहांना भारी पडत होता.
 
तुम्ही तलवारीचे वार अडवू शकता पण दुरून येणारे बाण आणि भाले कसे अडविणार? चहूबाजूंनी आग उसळली होती. शरीरावर अशी एकही जागा शिल्लक नव्हती की जिथे नवीन जखम होऊ शकेल, इतक्या जुन्या जखमांची जाळी झाली होती. युद्ध भडकले होते पण युद्धदेवता कुणावर प्रसन्न होईल हे सांगता येत नव्हते. एकीकडे प्रचंड सेनासामर्थ्य होते तर दुसरीकडे दुर्दम्य इच्छाशक्ती! सेनासामर्थ्याकडे इच्छाशक्ती आणि इच्छाशक्तीकडे सेनासामर्थ्य कमी होते. त्यामुळे पेटलेल्या प्रचंड रणधुमाळीमध्ये एकीकडे आदिलशाही सैन्यावर मराठी सैन्य भारी पडत होते तर दुसरीकडे त्यांच्या प्रचंड संख्येपुढे मराठी ताकद कमी पडत होती. मराठ्यांमध्ये वीरश्री संचारली होती. बाजींनी सगळी शक्ती पणाला लावली होती. पण राजे कुठपर्यंत पोहोचले होते? याची काहीही बातमी येणे शक्य नव्हते. कान तोफांकडे लागले होते. एक-दीड प्रहरात राजांनी पोचणे अपेक्षित होते. पण अजूनही तोफांचे बार उडालेले नव्हते.
 
तिकडे राजे ठरल्याप्रमाणे वेळेत विशाळगडाजवळ पोहोचले पण स्वराज्याचे दुर्दैव समोर उभे होते. सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव दळवी यांनी विशाळगडाला घेरले होते. ही बातमी राजांना माहिती नव्हती. कारण पन्हाळ्याचा वेढा इतका मजबूत होता की बाहेरची कुठलीही बातमी आत येत नव्हती. त्यामुळे या वेढ्याची कल्पना महाराजांना असणे अशक्य होते. आता एक गोष्ट मात्र नक्की झाली होती की जोवर महाराज हा वेढा फोडून गडाकडे जात नाही, तोवर बाजी आणि त्यांची फौज खिंडीत अडकणार. सुर्वे अन्‌ दळवी तर कमालीचे आश्चर्यचकित अन आनंदित झालेत की शिवाजी जिवंत त्यांच्यासमोर उभा होता. आता याला गिरफ्तार केले की बादशाहकडून सर्फराजी मिळणार होती. राजांनी या दोघांना पहिले अन्‌ त्यांच्या भुवया चढल्या, त्यांनी समशेर उपसली. ज्या समशेरीबद्दल कवी भूषण म्हणतो की,
 
पैज प्रतिपाल भूमीभारकौ हमाल चहौ।
चक्क को अमाल भयौ दंडत जिहान कौ।।
साहनकौ साल भयौ ज्वारीकौ जवाल भयौ।
हरकौ कृपाल भयौ हार के बिधानकौ।।
वीररस ख्याल सिवराज भुअपाल तुअ।
हाथकौ बिसाल भयौ भूषण बखानकौ।।
तेरौ करवाल भयौ दक्षिणकौ ढाल भयौ।
हिंदुनकौ दिवाल भयौ काल तुरकान कौ।।
 
शिवरायांची तलवार ही दख्खनची ढाल झालेली आहे, हिंदूंसाठी ती भिंतीसारखी भक्कम उभी आहे आणि तुर्कांसाठी ती काळ ठरली आहे. राजे आणि त्यांची माणसे शत्रूवर तुटून पडली. महाराजांचा आवेश आणि मारा इतका तुफानी होता की सुर्वे व दळवीची डाळ शिजता शिजेना. गडाखाली उसळलेली प्रचंड रणधुमाळी पाहून गडावरून मराठी सैन्य दौडत निघाले. वरून अन खालून आलेल्या मराठी सैन्याच्या कचाट्यात आदिलशाही फौजा सापडल्या. पण इकडे घोडखिंडीत परिस्थिती हाताबाहेर गेलेली होती. शत्रूसैन्य लगातार खिंडीत येऊन धडकत होते. मराठी सैन्याला बळ, शस्त्र अन्‌ रसद कोण पोचविणार? आता जवळजवळ वीस तास उलटून गेले होते मराठ्यांच्या पोटात अन्न गेले नव्हते.
 
महाराज कुठपर्यंत पोहोचले असतील, याची त्यांना कल्पना पण नव्हती. तीन- साडेतीन तासांत महाराजांनी विशाळगड गाठावा असा सगळ्यांचा अंदाज होता, आता सात-साडेसात तास उलटून गेले होते. एक पडला, दुसरा पडला, पन्नास, शंभर... शक्ती तर सातत्याने कमी होत होती. कुणाचा हात कटून पडला तर कुणाचा पाय, कुणाच्या छातीमध्ये तलवार, बाण रुतले, पण आपली जबाबदारी कुणीही सोडत नव्हता. भयानक रणकंदन माजले होते. मराठे मागे हटायला तयार नव्हते. तोफांचा आवाज येत नव्हता. राजे कुठे असतील हेही समजायला काही मार्ग नव्हता. शक्ती आटत चालली होती. सगळे प्रश्न अनुत्तरीत राहतात की काय, असे वाटत होते. प्राण कानाशी आलेले होते. पण तोफांचे बार कानी पडत नव्हते. बाजींवरही प्रचंड प्रमाणात घाव बसले होते. हृदयाची धडधड ऐकू येतच नव्हती. ऐकू येत होती, फक्त स्पंदने! हर हर महादेव! हर हर महादेव!!.
 
शारीरिक शक्ती तर कधीचीच संपली होती आता फक्त निर्धार लढत होता. पण कुठवर? कुणालाही आपल्या प्राणाची पर्वा नव्हती पण राजांना शपथ दिली होती की तुमच्या पाठीवर कुणाला येऊ देत नाही. त्या शपथेचे काय होणार ? आम्ही तर त्या संस्कृतीमध्ये जन्माला आलो आहोत की जिथे 'रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाऊ परू बचनु न जाई।' आणि जर इतकी मेहनत करून कुणी राजांवर आक्रमण करायला गेले तर? राजांना काही झाले तर? स्वराज्यात कुठे तोंड दाखवायचे? आऊसाहेब काय बोल लावतील? नाही नाही.. हे शक्य नाही, आम्ही असे होऊ देणार नाही. असे म्हणून ते अजून त्वेषाने शत्रूवर तुटून पडत होते. पण किती वेळ? आता सगळं संपत आलं होतं, शक्ती संपली होती, शत्रू आवरण्यापलीकडे गेला होता, मृत्यू घिरट्या घालत होता. आणि एवढ्यात, एवढ्यात धडाऽऽऽम्‌ धडाऽऽऽम्‌ तोफांचा धडाका सुरू झाला. मराठी पराक्रमापुढे सुर्वे अन्‌ दळवीचे सामर्थ्य आणि मनसुबे पार उद्‌ध्वस्त झाले. राजांनी कोंडी फोडली. राजे विशाळगडावर पोहोचले होते. जणू तोफांच्या तोंडून राजेच आवाज देत होते की- बाजी... बाजी... परत या बाजी... आम्ही विशाळगडावर पोहोचलो आहोत, बाजी..
 
राजे पोहोचले, आमचे राजे पोहोचले, स्वराज्याचे प्राण अलगद विशाळगडावर पोहोचले. कोण आनंद! कोण आनंद! त्या भयाण आणि युद्धज्वराने तप्त खिंडीमध्ये थंड हवेची झुळूक तरळून जावी, तद्वत तोफांच्या आवाजाने मराठ्यांची जखमी मने अन्‌ शरीरे हरखून गेली. जे अशक्य होते ते आज या सामान्य दिसणार्‍या मराठ्यांनी करून दाखवले होते. कोण होती हो ही माणसे कास्तकाराची, कुंभाराची, नाभिकांची, तेल्यांची, कुणब्यांची, ब्राह्मण, मराठ्यांची सामान्य दिसणारी ही माणसे. पण आज त्यांनी स्वराज्यावर किती मोलाचे उपकार केले होते. आज आपण स्वतंत्र आहोत कारण या लोकांनी देशासाठी आपले प्राण दिलेत म्हणून! अद्भुत! शब्दशः अद्भुत!! या पराक्रमाला तोड नाही. आनंद, निखळ आनंद! त्या आनंदातिरेकाचीच अनुभूती घेत बाजींनी डोळे मिटले ते कायमचे. हृदयाची धडधड थांबलेली होती, पण खिंडीमध्ये स्पंदने आजही जाणवतात म्हणे- हर हर हर हर महादेव! हर हर हर हर महादेव! बाजींचे रक्त घोडखिंडीमध्ये सांडले. खिंड पावन झाली. ती निर्जिव भौगोलिक जागा इतिहासात यावच्चन्द्रदिवाकरौ ‘पावनखिंड’ म्हणून प्रसिद्ध झाली. पावनखिंड!
 
(लेखक कार्पोरेट आणि व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षक आहेत.)
••