मनोज तिवारी नाचता बहोत अच्छा है...
   दिनांक :05-May-2019
केजरीवालांनी उधळली मुक्ताफळे
 
12 मे रोजी होणार्‍या दिल्लीतील सातही लोकसभा मतदारसंघात आता प्रचार शिगेला पोचला आहे. प्रचारफेर्‍या, रोड शो, सभा, मेळावे सुरू आहेत. यात आरोप प्रत्यारोप तर होणारच. त्यातही वाचाळ केजरीवाल यांना कोण रोखू शकतो?
दिल्लीचे मुख्यमंत्री अरिंवद केजरीवाल हे सध्या भाजपाच्या झंझावातामुळे हैराण झालेले दिसत आहेत. नुकतीच त्यांनी पूर्व दिल्लीचे भाजपा उमेदवार मनोज तिवारी यांच्यावर एक टिप्पणी केली.
मनोज तिवारी नाचता बहोत अच्छा है...पांडेजी (आपचे उमेदवार) को नाचना नही आता. काम करना आता है. इस बार काम करनेवाले को वोट देना, नाचनेवालेको नही...
 

 
 
मनोज तिवारी हे भोजपुरी चित्रपटांचे सुपरस्टार आहेत. त्यांनी केजरीवाल यांचे हे विधान गांभीर्याने घेतले आहे. ते म्हणाले की, माझ्यावर विखारी टीका करताना, केजरीवालांनी संपूर्ण पूर्वांचलातील जनतेचा अपमान केला आहे. त्यांच्या विधानाचे काय परिणाम होऊ शकतात, हे त्यांना पूर्वांचलातील जनता मतदानातून दाखवून देईल.
यावेळी दिल्लीत भाजपा, आप आणि कॉंग्रेस अशी तिहेरी लढत आहे. आधी कॉंग्रेस पक्षाला भ्रष्टाचारी संबोधून यथेच्छ शिव्या घालणार्‍या केजरीवालांनी कॉंग्रेससोबत युती करण्यासाठी अगदी लोटांगण घातले होते. पण, कॉंग्रेसने ताकास तूर लागू दिली नाही. आता केजरीवाल म्हणतात, कॉंग्रेसने भाजपाला मदत करण्यासाठीच आमच्यासोबत युती केली नाही. युती केली असती तर सर्व जागांवर कॉंग्रेस पराभूतच झाली असती. एकीकडे भाजपा केजरीवाल यांच्या वाट्टेल तशा विधानावर टीका करीत असतानाच, तिकडे कॉंग्रेसजनही केजरीवाल यांना झोडपून काढत आहेत. कॉंग्रेसने यावेळी दलित कार्ड समोर केले आहे. त्यासाठी उदित राज यांची ते मदत घेत आहेत. उदित राज यांना यावेळी तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी लगेच कॉंग्रेसमध्ये उडी घेतली आहे.
तर भाजपा दिल्लीच्या सर्वांगीण विकासासाठी मते मागत आहे. दिल्लीतील अराजकता संपविण्यासाठी यावेळी भाजपाला मतदान होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या पाच वर्षांत दिल्लीत केंद्र सरकारने अनेक योजना आणल्या. प्रामुख्याने नितीन गडकरी यांच्या विभागाने अनेक रिंग रोड, आऊटर रिंग रोड आणि महामार्ग बांधून दिल्लीकरांना बर्‍याच अंशी प्रदूषणापासून दिलासा दिला आहे. त्याचे चांगले परिणाम यावेळी दिसतील, असे दिल्लीकर बोलत आहेत. केजरीवाल मात्र चवताळल्यासारखे वागत आहेत. आपण पराभूत होणार, हे त्यांना पक्के माहीत आहे. पण, मरता क्या न करता या उक्तीनुसार ते नावासाठी मैदानात आहेत. तर कॉंग्रेस आपल्या बेताल विधानांमुळे अधिकच अडचणीत आली आहे. नुकतेच एक विधान माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी केले. निर्भया प्रकरण ही क्षुल्लक घटना होती. पण, या घटनेला विनाकारण अवास्तव प्रसिद्धी देण्यात आली आणि वातावरण पेटविण्यात आले. अशा घटना तर नेहमीच घडतात. शीलाताईंच्या या विधानावरूनही कॉंग्रेसवर प्रचंड टीका होत आहे.