जयचा वारसा सांभाळतोय ‘बली'
   दिनांक :05-May-2019
 पेंचच्या मानसिंग देव परिसरात होतेय दर्शन
नागपूर: आकाराने भव्य आणि शरीराने रुबाबदार अशी ख्याती असलेला जय नामक वाघ हा १८ एप्रिल २०१६ या वर्षी उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातून बेपत्ता झाला. सध्याच्या स्थितीत जयला गायब होउन तब्बल तीन वर्षाहून अधिकचा काळ लोटला आहे. परंतू या वाघाचा अजूनही ठावठिकाणा नाही. परंतू तेचाच शावक असलेला ‘बली' नामक वाघ हा पेंच व्याघ्रप्रकल्पातील खुर्सापार या परिसरात आपल्या दर्शनाने सर्वांना आनंद देत आहे. एवढेच नाही तर जय सारखाच दिसणारा हा वाघ पर्यटकांना देखील जय वाघाची आठवण देत आहे.

 
 
नागझिरा अभयारण्यातील जय आणि वीरु हे दोन वाघ एकाच वाघिणीचे छावे होते. नागझिऱ्यात जन्मलेल्या या दोन्ही वाघांनी कालांतराने नागझिरा सोडून इतरत्र आपले अस्तित्व निर्माण केले. सन २०१३ साली जय वाघाने उमरेड-कऱ्हांडला येथे आपले अस्तित्व निर्माण केले. त्याने येथील आपल्या वास्तव्यात तब्बल पाच वाघिणीच्या मिलनातून २० शावकांना जन्म दिला. त्यापैकी श्रीनिवास, बिट्टू आणि जयचंद या तीनच वाघांची चर्चा वारंवार होतांना दिसून येते. मात्र आता पेंच बफरच्या खुबाडा गेट सालेघाट क्षेत्रातील मानसिंग देव परिसरात सहजच दर्शन देणाऱ्या ‘बली' नामक वाघाची देखील चर्चा सुरु झाली आहे. जयला चांदी नामक वाघीणीपासून ‘बली' या वाघाचा जन्म झाला आहे. जयप्रमाणेच रुबाबदार आणि तडफदार असा बली हा सध्या येथील परिसरात आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. काही वन्यजीव प्रेमी याला बली तर काही याला सॅण्टा देखील म्हणतात. बलीच्या कपाळावर ख्रिसमस च्या झाडासारखे चित्र तयार होत असल्याने याला अनेकजण सॅण्टा देखील म्हणतात. इतर मोसमात क्वचितच आढळणारा बली हा उन्हाळ्यात जंगलात नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत आटल्याने कृत्रिम पाणवठ्यावर या वाघाला वारंवार पाहिल्या जात असल्याची माहीती या परिसरातील वन्यजीव प्रेमींनी दिली. बलीच्या सहजच दर्शनामुळे वन्यजीव प्रेमी आणि पर्यटनप्रेमींची संख्या त्याला पाहण्यासाठी  दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते.