पूर्व दिल्लीत तिरंगी लढतीत भाजपाचे पारडे जड
   दिनांक :05-May-2019
श्यामकांत जहागीरदार
 
 
पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर, कॉंग्रेसचे अरिंवदरिंसह लवली आणि आपच्या आतिशी यांच्या तिरंगी लढत होत आहे. या तिरंगी लढतीचा फायदा भाजपाला मिळण्याची शक्यता आहे.
दिल्लीतील सातपैकी पाच खासदारांना रिंगणात कायम ठेवत भाजपाने फक्त दोन विद्यमान खासदारांची तिकिटे कापली, यात पूर्व दिल्लीचा समावेश होता. पूर्व दिल्लीत भाजपाने महेश गिरी या विद्यमान खासदाराला उमेदवारी नाकारत माजी क्रिकेटपटू असलेल्या गौतम गंभीरला उमेदवारी दिली आहे. मात्र बाहेरचा उमेदवार असा प्रचार गंभीर यांच्यासाठी थोडा अडचणीचा ठरत आहे. त्यामुळे आपला पूर्व दिल्लीशी कसा संबंध होता, गांधीनगरमध्ये आपल्या भावाचा व्यवसाय होता, हे सांगण्यात गंभीर यांची ताकद खर्ची पडत आहे.
 

 
 
क्रिकेट सोडल्यानंतर गौतम गंभीर यांनी समाजसेवेचा मार्ग पत्करला. सुकमा येथील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या 25 जवानांच्या शिक्षणाचा खर्च गंभीर यांनी उचलत आपली संवेदनशीलता दाखवून दिली होती.
दिल्लीत भाजपाने आपले उमेदवार सर्वात शेवटी जाहीर केले. आपने सर्वात आधी आतिशी यांची उमेदवारी जाहीर केली. कॉंग्रेस आणि आप यांच्यात जागावाटपाचा घोळ सुरू असताना पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघात आतिशी यांनी आपला प्रचार सुरू केला होता. आतिशी यांनी अन्य दोन उमेदवारांपेक्षा प्रचारात आघाडी घेतली आहे.
आतिशी यांचे आडनाव मार्लिना आहे, पण मार्लिना आडवनावावरून त्या ख्रिश्चन असल्याचा भास होत असल्यामुळे निवडणुकीतील आपले संभाव्य नुकसान टाळण्यासाठी त्यांनी आपल्या आडनावाचा त्याग करत यापुढे आपल्याला फक्त आतिशी नावानेच ओळखण्यात यावे, असे जाहीर केले. विरोधक याचाही प्रचारात उपयोग करून घेत आहेत.
भाजप आणि आप उमेदवारांच्या तुलनेत कॉंग्रेसचे अरिंवदरिंसह लवली अनुभवी नेते आहेत. दिल्ली प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्षपद भूषवलेले लवली तीनदा आमदार आणि शीला दीक्षित सरकारमध्ये एकदा मंत्रीही होते. शीला दीक्षित यांचे विश्वासू समजल्या जाणार्‍या लवली यांनी 2017 मध्ये महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला. महापालिका निवडणुकीत भाजपाचा प्रचार करणार्‍या लवली यांनी वर्षभरातच पुन्हा भाजपा सोडत कॉंग्रेसमध्ये आपली घरवापसी करून घेतली.
पूर्वी दिल्ली लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे लक्ष्मीनगर, कृष्णानगर, गांधीनगर, विश्वासनगर, पटपरगंज, जंगपुरा, ओखला, कोंडली, त्रिलोकपुरी आणि शाहदरा असे दहा मतदारसंघ आहेत. यातील विश्वासनगर हा एकमेव मतदारसंघ भाजपाकडे आहे. ओमप्रकाश शर्मा येथील आमदार आहेत.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे महेश गिरी यांनी आपचे राजमोहन गांधी यांचा जवळपास 1 लाख 90 हजार मतांनी पराभव केला होता. महेश गिरी यांना 5 लाख 72 हजार तर राजमोहन गांधी यांना 3 लाख 81 हजार मते मिळाली होती. 2004 आणि 2009 मध्ये लोकसभेत पूर्व दिल्ली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे कॉंग्रेसचे संदीप दीक्षित यांना यावेळी तिसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले. दीक्षित यांना दोन लाख तीन हजारावर मते पडली होतीे. 1991 मध्ये भाजपाचे बैकुंठलाल शर्मा या मतदारसंघातून सर्वप्रथम निवडून आले. 1996 मध्ये हा मतदारसंघ त्यांनी आपल्याकडे कायम राखला. मात्र त्यांच्या निधनाने 1997 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचे लालबिहारी तिवारी येथून विजयी झाले होते. तिवारी यांनी 1999 च्या निवडणुकीत मतदारसंघ आपल्याकडे कायम ठेवला.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री हरकिशनलाल भगत 1971 मध्ये पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले, मात्र आणिबाणीनंतर 1977 मध्ये झालेल्या निवडणुकीत जनता पक्षाचे किशोरलाल यांनी त्यांचा पराभव केला. नंतर मात्र 1980, 1984 आणि 1989 अशा सलग तीन निवडणुकीत भगत या मतदारसंघातून विजयी झाले. या मतदारसंघाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने कॉंग्रेस आणि भाजपा यांना विजयाची जवळपास समसमान संधी दिली.
2014 मध्ये आप आणि कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या मतांची बेरीज भाजपा उमेदवाराच्या मतांपेक्षा जास्त होती. त्यामुळे यावेळी दिल्लीत आप आणि कॉंग्रेस यांच्यात आघाडी झाली असती आणि कॉंग्रेस आप आघाडीचा एकच उमेदवार रिंगणात असता तर भाजपाच्या अडचणी वाढल्या असत्या.
पूर्व दिल्ली मतदारसंघात 12 मेला सहाव्या टप्प्यात मतदान होत आहे. त्यामुळे प्रचाराने वेग घेतला आहे. रोडशो, पदयात्रा, जाहीर सभा यासोबतच एकमेकांविरुध्द आरोपप्रत्यारोपही सुरू झाले आहेत. भाजपा विकासाच्या मुद्यावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात तर आप आणि कॉंग्रेस भाजपाविरोधाच्या मुद्यावर मते मागत आहे.
दिल्लीत आप आणि कॉंग्रेस यांच्यात आघाडी न झाल्यामुळे पूर्व दिल्लीतच नाही तर संपूर्ण दिल्लीतील सात लोकसभा मतदारसंघात होणार्‍या तिरंगी लढतीचा फायदा भाजपाला मिळणार आहे.