आता 'चॉईस नंबर' मिळवा ऑनलाईन
   दिनांक :05-May-2019
 
 
मुंबई : वाहनासाठीचे पसंती क्रमांक (चॉइस नंबर) आता ऑनलाइन पद्धतीने आता लवकरच शक्य होणार आहे.  या क्रमांकासाठी होणारे लिलावही ऑनलाइन पद्धतीनेच होणार असल्याचे समजते. त्यासाठी परिवहन कार्यालयाने पसंती क्रमांकाच्या नियमावलीत बदल केले आहेत. तसेच 'नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर'च्या (एनआयसी) माध्यमातून यासाठीची संगणकीय प्रणाली निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच पसंती क्रमांकांची 'ऑफलाइन' पद्धत बंद होऊन वाहन खरेदीदारांना ऑनलाइन पद्धतीने पसंती क्रमांक खरेदी करता येणार आहे.

 
 
 
परिवहन विभागाने एनआयसी, दिल्लीच्या माध्यमातून 'सारथी' व 'वाहन' या संगणक प्रणालीमार्फत २०१७ पासून वाहनविषयक सर्व सेवा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध केल्या आहेत. आरटीओशी संलग्न सर्व कामे नागरिकांना घरबसल्या करता यावीत, नागरिकांना आरटीओमध्ये हेलपाटे मारण्याची आवश्यकता भासू नये, आरटीओतील गर्दी व कर्माचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी करणे यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. सर्व प्रकारचा वाहनचालक परवाना, वाहन नोंदणी, योग्यता प्रमाणपत्र, वाहनावरील कर्ज बोजा चढविणे-उतरिवणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र, सर्व कर भरणे आदी सेवा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सेवांबरोबरच पसंती क्रमांकही नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने घेता यावेत, यासाठी 'एनआयसी'ने यंत्रणा तयार केली आहे. पसंती क्रमांक ऑनलाइन पद्धतीने देण्यासाठी नियमावलीत बदल करणे आवश्यक होते. त्यामुळे यंत्रणा तयार असूनही ही सेवा ऑनलाइन होत नव्हती.
राज्यातील इतर आरटीओंपेक्षा पुणे आरटीओला चॉइस नंबरच्या माध्यमातून सर्वाधिक महसूल मिळतो. पुण्यात एका वर्षात दुचाकीच्या १८ ते २० आणि चारचारी वाहन क्रमांकाच्या चार ते पाच मालिका संपतात. या मालिकांतील आकर्षक व पसंती क्रमांकाच्या माध्यमातून पुणे कार्यालयाला एका वर्षात सुमारे २० ते २४ कोटींचा महसूल मिळतो. मात्र, या क्रमांक वितरणाची सेवा पुरविण्यासाठी आरटीओला मोठे मनुष्यबळ खर्ची करावे लागते. त्यामुळे ही सेवा ऑनलाइन पद्धतीने कार्यान्वित होणे गरजेचे आहे, अशी मागणी आरटीओ कर्मचाऱ्यांबरोबरच नागरिकही करीत होते. या मागणीनुसार परिवहन आयुक्त कार्यालयाने 'पसंती क्रमांका'च्या ऑनलाइन वितरणला होकार दिला आहे.